गेल्या 11 दिवसापासून सुरू असलेला महाराष्ट्रात चालू असलेला महायुतीतील सत्तानाट्य अखेर संपले असून आज देवेंद्र फडणवीस यांची विधीमंडळाचा नेता म्हणून निवड करण्यात आली आहे . त्यामुळे फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार असल्याचे आता अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आले आहे. उद्या 5 डिसेंबर रोजी फडणवीस यांचा आझाद मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत ग्रँड शपथविधी सोहळा पार पडणार आहे. मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीनंतर राज्याचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून फडणवीस राज्याचा कारभार संभाळणार आहेत .
आज भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली आहे. या बैठकीत भाजपचे वरिष्ठ नेते, केंद्रीय निरीक्षक विजय रुपाणी आणि निर्मला सीतारमण हे हजर होते. यावेळी गटनेतेपदासह विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. यानंतर विधानभवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये भाजपच्या आमदारांची विधिमंडळ गटनेता निवडीची बैठक सुरु झाली आहे. यावेळी सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील यांनी गटनेतेपदाचा प्रस्ताव मांडला. तर आशिष शेलार आणि रविंद्र चव्हाण यांनी या प्रस्तावावर अनुमोदन दिले.यावेळी भाजपाच्या आमदारांकडून विधीमंडळ पक्ष बैठकीमध्ये ‘हमारा नेता कैसा हो?’ ‘देवेंद्र फडणवीस जैसा हो’च्या घोषणा दिल्याचे बघायला मिळाले.
त्यानंतर अखेर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या विधीमंडळ गटनेतेपदी एकमताने निवड करण्यात आली आहे. केंद्रीय निरीक्षक विजय रुपाणी आणि निर्मला सीतारमण यांच्या उपस्थितीत विधिमंडळ पक्षनेतेपदी शिक्कामोर्तब करण्यात आले. देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड झाल्यानंतर अखेर सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यावेळी यांनी भाषण केले. त्यावेळी आपल्या भाषणात ते म्हणाले आहेत की, “पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली आपण महाविजय मिळवला. यासाठी सर्वांनी मेहनत केली. मोदीजींच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये डबल इंजिन सरकार आणले. जनेतेने आपल्याला भरभरुन यश दिले. आपण जनतेचे आभार मानले पाहिजेत. आजचा दिवस ऐतिहासिक आहे. आत्तापर्यंतचा हा सर्वात मोठा विजय आहे. आपल्याला सात अपक्ष आमदारांनीही पाठिंबा दिला आहे. भाजपचेच एकूण 137 आमदार आहेत. देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आपण हे यश मिळवले आहे . महाराष्ट्रासाठी पुढची पाच वर्ष ऐतिहासिक ठरणार आहेत” .