यंदाची निवडणूक ऐतिहासिक होती. ‘एक है तो सेफ है’, ‘मोदी है तो मुमकीन है’, यावर विश्वास दाखवत जनतेने महायुतीला अभूतपूर्व जनादेश दिला. त्याबद्दल राज्याच्या जनतेला साष्टांग दंडवत घालतो. तसेच एकनाथ शिंदे, अजित पवार आणि मित्र पक्षांचे आभार मानतो, अशा शब्दांत भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. भाजपच्या विधीमंडळ गटनेतेपदी एकमताने निवड झाल्यानंतर मनोगत व्यक्त करताना फडणवीस बोलत होते.
याप्रसंगी फडणवीस म्हणाले की, भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षात महायुतीचे सरकार स्थापन होत आहे. याचा विशेष आनंद आहे. देशाचे दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची जन्म शताब्दी याच वर्षी आहे. या महत्त्वाच्या वर्षात मोठी जबाबदारी आणि जनादेश महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला दिला आहे. लाडक्या बहिणी, लाडका भाऊ, शेतकरी, दलित आदींसह सर्व समाजातील घटकांनी विश्वास दाखविला. त्याबद्दल आभार मानतो. आम्हाला अभिमान आहे की, 2019 नंतर एकही आमदार किंवा नेता आम्हाला सोडून गेला नाही. सर्वजण एकत्र राहिले आणि आम्ही 2022 मध्ये सरकार स्थापन केले. आज महायुतीलाही सत्ता मिळाली आहे. मोदीजी सलग तीन वेळा पंतप्रधान झाले आहेत आणि आता मी वॉर्ड स्तरावरचा कार्यकर्ता सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झालो आहे. पंतप्रधान मोदी आणि अमित शाह या दोघांनीही महाराष्ट्र भाजपला निवडणुकीत मोठा पाठिंबा दिला . या निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळाले.त्यामुळे आमची जबाबदारी आता अधिक वाढली आहे.
महायुती महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी, उन्नतीसाठी 24 तास काम करेल.जनतेच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी कटीबद्ध असेल, अशा भावना फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केल्या आहेत. महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पुढे आणण्याकरता आपल्याला सातत्याने काम करावं लागणार आहे. यापूर्वी2019 मध्ये बेईमानी झाली पण जुन्या गोष्टींचा उल्लेख करणार नाही. त्यावेळी सगळे आमदार संघर्ष करत होते. मात्र एकही आमदार आपल्याला सोडून गेला नाही. असे फडणवीस आवर्जून म्हणाले आहेत.
पंतप्रधान मोदी यांनी बूथवर काम करणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून संधी दिली. त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो. असे म्हणत गृहमंत्री अमित शाह, जेपी नड्डा यांच्यासह शिवसेना आणि राष्ट्रवादीसह भाजप कार्यकर्त्यांचे देखील फडणवीसांनी आभार मानले आहेत.