महाराष्ट्रात 12 दिवसांच्या घडामोडीनंतर अखेर काल या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांची भाजप विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे . आता देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदाची, तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार हे निश्चित झाले आहे. आज संध्याकाळी साडेपाच वाजता महायुतीचा हा भव्य दिव्य शपथविधी सोहळा मुंबईतील आझाद मैदानात पार पडणार आहे या सोहळ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्यासह सर्व NDA शासित राज्यांचे मुख्यमंत्री सहभागी होणार आहेत.
मुंबईतील आझाद मैदानाच्या आसपासच्या परिसरात मुख्यमंत्री-नियुक्त देवेंद्र फडणवीस, शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांची पोस्टर्स लावण्यात आली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री-भाजप प्रमुख जेपी नड्डा यांची पोस्टर्सही दिसत आहेत.
हा शपथविधी न भूतो न भविष्यति व्हावा यासाठी विशेष लक्ष दिलं जात आहे. म्हणूनच शपथविधीवेळी शपथ घेणाऱ्या नेत्यांसाठी खास तुकाराम पगडी तयार केली जात आहे. पुण्यात या पगड्या तयार करण्यात आल्या आहेत. दरम्यान शपथविधीच्या वेळी भाजप कार्यकर्ते एक रहेंगे तो सेफ रहेंगेचे टी-शर्ट घालणार आहेत. तर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते गुलाबी रंगाचे टी-शर्ट आणि फेटे परिधान करणार आहेत. दुसरीकडे महिलांनाही गुलाबी साड्या आणि गुलाबी फेटे वापरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान मुंबई पोलिसांनीही या सोहळ्यासाठी विशेष सुरक्षा बंदोबस्त ठेवला आहे.
विधानसभा निवडणुकीत महायुतीला जनतेनं स्पष्ट बहुमत दिले होते. त्यानंतर जवळपास दहा दिवसानंतर राज्याला नवं सरकार मिळणार आहे. एकनाथ शिंदे शपथ घेणार की त्यांच्या पक्षाचे अन्य नेते शपथ घेणार हे अजून स्पष्ट नाही. हा शपथविधी सोहळा आझाद मैदानात होणार आहे. हा शपथविधी सर्वांच्याच लक्षात रहावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत. पंतप्रधानांपासून अगदी भाजपसहित एनडीएच्या सर्व राज्यांतील मुख्यमंत्र्यांना यासाठी आमंत्रित करण्यात आलं आहे. याशिवाय विविध पक्षांचे प्रमुख नेते, संत-महंत, विविध क्षेत्रांतील प्रमुख मान्यवरांना बोलावण्यात आले आहे. तसेच हा सोहळा याचि देहि याचि डोळा पाहण्यासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने पक्षांचे कार्यकर्तेदेखील उपस्थित राहणार आहेत.
दुसरीकडे नागपूरमधील पिंटू मेहाडिया हे फडणवीस यांच्यासाठी शिवलेले कोट घेऊन मुंबईत दाखल झाले आहेत. मेहाडिया यांच्याकडून देवेंद्र फडणवीस कोट शिवून घेतात. नागपूरचे महापौर झाल्यानंतर फडणवीस यांनी मेहाडिया यांच्याकडूनच कोट शिवून घेतला होता. देवेंद्र फडणवीस यांचा आवडता रंग निळा असून त्यांच्या आवडीनुसार निळ्या रंगातील तीन वेगवेगळे कोट शिवण्यात आले आहेत. तर एक कोट राखाडी रंगाचा आहे. फडणवीस हे खास प्रसंगी किंवा कार्यक्रमासाठी कोट घालतात. गेल्या दहा वर्षांपासून फडणवीस यांनी नियमित जॅकेट घालायला सुरुवात केली होती.
मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीसाठी पुण्यातील मुरुडकर झेंडेवाले यांच्याकडे खास जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांनी शपथविधीसाठी तुकाराम पगड्या तयार केल्या आहेत. शपथ घेणाऱ्या नेत्यांबरोबरच प्रमुख नेत्यांना या पगड्या दिल्या जाणार आहेत. पुण्यातील मुरुडकर झेंडेवाले यांच्याकडे भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षातील काही नेत्यांसाठी खास तुकाराम पगडी बनविण्यात आली आहे. शपथविधीत या पगड्या आकर्षचाचे केंद्र ठरणार आहेत.
अजित पवारांनी निवडणुकीचा प्रचार देखील गुलाबी रंगाचे जॅकेट परिधान करून केल्याचे दिसून आले होते. यानंतर आता या गुलाबी रंगाच्या पगड्या खास अजित पवारांनी आपल्या आमदारांसाठी मागवल्या असल्याचं बोलले जात आहे.राष्ट्रवादी काँगेसच्या ओबीसी सेलच्या कार्यकर्त्याच्या मागणीनुसार या पगड्या तयार करण्यात आल्या आहेत, अशी माहिती गिरीश मुरुडकर यांनी दिली आहे.
मुंबईच्या आझाद मैदानात महायूतीच्या शपथविधीसाठी मुंबई पोलिसांकडून राहणार चोख पोलिस बंदोबस्त असणार आहे. शपथविधी सोहळ्या दरम्यान होणारी गर्दी लक्षात घेता मुंबई पोलिसांकडून अडीच हजारांहून अधिक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शपथविधी दरम्यान 10 पोलिस उपायुक्त, 20 सहाय्यक पोलिस आयुक्त, 100 पोलिस निरीक्षक, 150 सहाय्यक व पोलिस उपनिरीक्षकांसह 1500 हून अधिक पोलिस कर्मचारी बंदोबस्तासाठी उपस्थित राहणार आहेत. याच बरोबर सशस्र पोलिस दल, टास्क फोर्ससह इतर सुरक्षा यंत्रणाही सज्ज असणार आहेत. या शिवास आझाद मैदान परिसर हा नो फ्लाईंग झोन म्हणून घोषित करण्यात आला असून आजू बाजूच्या उंच इमारतींवरही पोलिस तैनात असणार आहेत. शिवाय ड्रोनद्वारेही पोलिसांची करडी नजर असणार आहे.