पूर्वोत्तर भारतातील आसाममध्ये गोमांसावर बंदी घालण्यात आली आहे. आसाम मंत्रिमंडळाने राज्यातील सर्व हॉटेल, रेस्टॉरंट आणि सार्वजनिक ठिकाणी गोमांसावर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले आहे. दरम्यान आगामी 7 डिसेंबर रोजी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्येही त्यांनी सांगितले.
आसाममध्ये गोमांस बंदीच्या निर्णयानंतर आसामचे मंत्री पियुष हजारिका यांनी पोस्ट केली आणि काँग्रेसला थेट आव्हान दिले आहे की . काँग्रेसने गोमांस बंदीचे स्वागत करावे किंवा पाकिस्तानात जाऊन स्थायिक व्हावे, असे हजारिका म्हणाले आहेत.
आसाममधील काँग्रेस खासदार रकीबुल हुसैन यांनी भाजपवर नागाव जिल्ह्यातील समगुरी विधानसभा मतदारसंघात बीफ पार्टी आयोजित केल्याचा आरोप केला होता. मुस्लिम मतदारांना आकर्षित करण्यासाटी ही बीफ पार्टी आयोजित केल्याचे त्यांनी म्हटले होते. यावर हिमंता यांनी हुसैन यांच्या वक्तव्याबाबत गोमांसबाबतच्या भूमिकेबाबत प्रदेश काँग्रेस अध्यक्षांना पत्र लिहिणार असल्याचे सांगितले होते. तसेच पुढील विधानसभेच्या अधिवेशनात बीफवर पूर्णपणे बंदी घालणार आहे. मग भाजप, एजीपी, सीपीएम, कोणीही गोमांस देऊ शकणार नाही. हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन या सर्वांनी गोमांस खाणे बंद होईल असे मुख्यमंत्री सरमा म्हणाले होते.
गोहत्येबाबत भारतात कोणताही कायदा नाही. पण वेगवेगळी राज्ये असा कायदा बनवू शकतात. हरियाणात गोहत्याबंदी कायद्याचे उल्लंघन केल्यास 1 लाख रुपये दंड आणि 10 वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूद आहे. छत्तीसगड हे एकमेव राज्य आहे जिथे गायी आणि म्हशीच्या मांसावरही बंदी आहे. बिहार, झारखंड, ओडिशा, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, गोवा आणि केंद्रशासित प्रदेश दमण आणि दीव, दादरा आणि नगर हवेली, पुडुचेरी आणि अंदमान निकोबारमध्ये आंशिक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.