“मेरा पानी उतरता देख मेरे किनारे पर घर मत बसा लेना, मै संमदर हूँ लौटके वापस आऊंगा”, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात पुन्हा भाजपची लाट आणली. संयमी, शांत आणि धोरणी अशी ओळख असलेले फडणवीस भाजपसाठी महाराष्ट्राचे चाणक्य ठरले आहेत. २०१९ नंतर महाराष्ट्रातील राजकीय समीकरणं बदलेली असताना देखील एका तळपत्या सूर्याप्रमाणे आपलं काम सुरू ठेवून २०२४ मध्ये त्यांनी पुन्हा भाजपला घवघवीत यश मिळवून दिलं. आपल्या साम, दाम, दंड भेद या नीतीचा वापर करून ते आज तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत. अशा या राजकीय चाणाक्याच्या चाणक्यनीतीविषयी आणि राजकीय प्रवासाविषयी माहिती खालीलप्रमाणे
देवेंद्र फडणवीस यांच्या कुटुबाला तशी राजकीय पार्श्वभूमी आहे. फडणवीस यांचे वडील गंगाधर फडणवीस हे महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते तर आई सरिता फडणवीस या विदर्भ गृहनिर्माण पतसंस्थेच्या संचालक होत्या. फडणवीस यांच्या राजकीय प्रवासाची सुरवात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसेच भाजप पक्षाशी संबंधीत असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून झाली. अभविप संघटनेमध्ये ते महाविद्यालयीन कार्यकर्ता या नात्याने सक्रिय होते. १९९२ मध्ये वयाच्या केवळ २२ व्या वर्षी ते नागपूर महानगरपालिकेचे नगरसेवक झाले. त्यानंतर पाच वर्षांनी म्हणजेच 1997 मध्ये फडणवीस हे नागपूर महानगरपालिकेचे सर्वांत तरुण महापौर बनले. त्यावेळी त्यांचं वय २७ वर्ष होतं त्यामुळे भारताच्या इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात तरुण महापौर बनण्याचा मानही फडणवीस यांच्या नावावर आहे. त्यानंतर १९९९ पासून ते आजपर्यंत ते विधानसभेला नागपूर मतदार संघाचं प्रतिनिधित्व करत आहेत.
विरोधी पक्ष कोणीही असो एकएक मुद्दे मांडून सत्ताधाऱ्यांना घाम फोडावा लागतो तो खरा विरोधी पक्ष शोभतो. एकेकाळी विधानसभेत भाजप जेव्हा विरोधी पक्ष म्हणून काम करत होता तेव्हा विविध विषयांची आकडेवारी, डाॅक्यूमेन्टस भाजपला पुरविण्यात देवेंद्र फडणवीस यांचा मोठा हात होता. एकंदरीत एक अभ्यासू नेते म्हणूनही त्यांची ओळख आहे. फडणवीस यांनी नागपूर विद्यापीठाच्या शासकीय विधी महाविद्यालयातून कायद्याची पदवी तसेच व्यवसाय व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदवी आणि जर्मन मधील बर्लिन इथून जर्मन फाउंडेशन फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट मेथड्स अँड टेक्निक्स ऑफ प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये त्यांनी पदविका प्राप्त केली आहे.
२०१४ मध्ये देशासह महाराष्ट्रात जेव्हा भाजपची लाट आली तेव्हा देवेंद्र फडणवीसांना राज्याचं मुख्यमंत्रीपद देण्याचा निर्णय भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून घेण्यात आला. कारण देवेंद्र फडणवीस हे एक असं वादळ म्हणून राज्यात वाहत होतं ज्या वादळापुढे महाराष्ट्राच्या राजकारणातील चाणक्य समजल्या जाणाऱ्या शरद पवारांची चाणक्यनीती देखील चालत नव्हती. २०१४ मध्ये त्यांनी पहिल्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि राज्यातील दुसरे सर्वात तरूण मुख्यमंत्री असा मान देखील मिळवला. खरं म्हणजे विदर्भातील अनेक भाजपच्या नेत्यांना लोकप्रियता मिळाली पण महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याचा बहुमान देवेंद्र फडणवीस यांना मिळाला.
पहिल्यांदाच मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी राज्याला एक नवी दिशा देण्याचा प्रयत्न सुरू केला. पोलीस डिजिटायझेशन प्रकल्प, सायबर लॅबचा शुभारंभ आणि गाव डिजिटलीकरण, समृद्धी एक्सप्रेस वे, सरकारी नोकऱ्यांमध्ये अनाथांसाठी 1% आरक्षण, सीएम फेलोशिप योजना, छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना, मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प, स्वयंचलित हवामान स्टेशन अशी कितीतरी विकासकामं सुरू केली ज्याची महाराष्ट्र अनेक दिवसांपासून वाट पाहत होता.
देवेंद्र फडणवीस हे कधी किंग तर कधी किंगमेकर ठरले. २०१९ मध्ये उद्धव ठाकरे यांनी साथ सोडल्यानंतर विरोधी पक्षनेते म्हणून काम करताना ते एका वेगळ्या पण अधिक आक्रमक भूमिकेत दिसले. सर्वच पक्षातील नेत्यांशी त्यांनी जवळचे संबंध ठेवले. त्यामुळे इतर पक्षात असलेली धुसफूस लक्षात घेऊन आपली चाणक्यनीती वापरून ते एकनाथ शिंदे यांना सोबत घेऊन २०२२ मध्ये पुन्हा सत्तेत आले. परंतु शिंदेंसोबत त्यांना उपमुख्यमंत्री पदावर बसावं लागलं तरीही त्यांनी ते स्वीकारलं. तिथेच त्यांच्यातला शांत, सहनशील आणि संयमी नेता महाराष्ट्राने पाहिला. पक्षाच्या शिस्तीपुढे त्यांनी दुसऱ्या कशालाही महत्त्व दिलं नाही. कोणतेही आढेवेढे न घेता त्यांनी उपमुख्यमंत्रीपद घेतलं आणि निभावलं सुद्धा.
२०२४ च्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला म्हणाव तसं यश मिळालं नाही. त्यावेळी त्यांनी अपयशाचं सर्व खापर स्वत:च्या माथ्यावरती घेतलं आणि राजीनाम्याची तयारीही दाखवली. लोकसभेच्या निवडणुकीला कुठे फटका बसला याचं आत्मचिंतन करून ते पुन्हा विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारीला लागले. यावेळी शेतकरी वर्गासह सर्वसामान्य लोकांना त्यांनी विश्वासात घेतलं आणि हिंदू मतांचं विभाजन होणार नाही, याची पूर्णपणे काळजी घेत पुन्हा भाजपला राज्यात यश मिळवून दिलं.
देवेंद्र फडणवीस यांचा आणखी एक गुण जनतेला भावला तो म्हणजे प्रचारादरम्यान किंवा इतर वेळी ते कधीही विरोधकांवर खालच्या शब्दात टीका करताना दिसत नाहीत. विरोधकांनी कितीही जहरी शब्दात त्यांच्यावर टीका केली तरीही ते आपला संयम सोडत नाहीत, शांतता बाळगून असतात. असा हा शांत, संयमी आणि धोरणी नेता आज मी देवेंद्र गंगाधरराव फडणवीस म्हणत आता तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहे.
– निकिता पाटील