महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा शपथविधी सोहळा पार पडला असून, देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईतील आझाद मैदानावर महाराष्ट्राचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. तसेच शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी देखील उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे.
मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वरसाक्ष शपथ घेतो की… असे म्हणत भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे . २१ वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस राज्याचा कारभार पाहणार आहेत. राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी देवेंद्र फडणवीस यांना शपथ दिली. यासोबतच त्यांनी गोपनीयतेचीही शपथ घेतली. देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेताच आझाद मैदानात उपस्थित सर्वांनी मोठा जल्लोष केलेला दिसून आला.
आझाद मैदानावर संपन्न झालेल्या या शपथविधी सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्री उपस्थित होते. तसेच राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार असलेले 22 राज्यांचे मुख्यमंत्रीही आले होते. उद्योगपती आणि बॉलीवूड स्टार यांनीही या सोहळ्याला हजेरी लावली.सचिन तेंडुलकर आणि त्याची पत्नी अंजली तेंडुलकर शपथविधी सोहळ्यास उपस्थित होते. शेकडो दिग्गज व्यक्ती, साधू-महंत आणि 40 हजार नागरिकांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा भव्य शपथविधी सोहळा पार पडला.
देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे स्मरण करून शपथ घेतली. तर गुलाबी जाकीट परिधान केलेले राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी गांभीर्यपूर्वक शपथ घेतो की, असे म्हणत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
महाराष्ट्राच्या या शपथविधी सोहळ्याला शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे अनुपस्थित होते.
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण होणार? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. भाजपने 132 जागांवर विजय मिळवला होता. त्यामुळे भाजपचाच मुख्यमंत्री बनेल हे जवळपास निश्चित होते. मात्र आज 13 दिवसांच्या प्रतिक्षेनंतर महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळाला आहे.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांची बुधवारी एकमताने भाजपच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली होती. केंद्रीय पक्षनिरीक्षक म्हणून मुंबईत आलेल्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, भाजप नेते विजय रूपाणी यांच्या उपस्थित देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली होती. यानंतर महायुतीच्या नेत्यांनी राजभवनावर जाऊन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे सत्तास्थापनेचा दावा केला. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह मित्रपक्षांच्या एकूण 237 आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र राज्यपालांकडे सादर करण्यात आले होते.