राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल पहिल्यांदाच पत्रकार परिषद पार पडली आहे. यामध्ये ते म्हणाले आहेत की, महाराष्ट्राच्या विकासाला प्राधान्य दिले जाईल. सूडाचे राजकारण करणार नसून महाराष्ट्र बदलण्याचे राजकारण आपण करणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. तसेच आपण ,एकनाथ शिंदे आणि अजित पवार या तिघांच्या भूमिका बदलल्या असल्या तरी दिशा, गती आणि समन्वय कायम आहे.
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत फडणवीस काय म्हणाले?
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “कोणते मंत्रिपद कोणाकडे राहणार हे अंतिम टप्प्यात असून ते आपण तिघे मिळून ठरवू. जुन्या मंत्र्यांच्या कामाचेही आम्ही मूल्यमापन करू आणि त्याआधारे पुढील निर्णय घेतले जातील.
जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपल्याला वेगाने काम करावे लागेल, असे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले आहे .आता आपण गती वाढवूया आणि अधिक खोलात जाऊन शाश्वत विकास कसा साधता येईल यावर चांगले निर्णय घेऊ, असेही ते म्हणाले. नवनिर्वाचित मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजनेंतर्गत सर्व भगिनींना दरमहा २१०० रुपये देणार असून ही योजना भविष्यातही सुरू राहणार असल्याचे सांगितले. तसेच निवडणुकीपूर्वी जे काही आश्वासन दिले ते पूर्ण केले जाईल.
गृह मंत्रालय आणि जात जनगणनेवर मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गृह मंत्रालय हे एक असे खाते आहे ज्यामध्ये तुम्हाला शिव्या जास्त मिळतात, मात्र असे असतानाही तुम्हाला हे मंत्रालय मनापासून सांभाळावे लागते. मी ते मनापासून हाताळले आहे. या कार्यकाळातही महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था चांगली राहावी आणि महाराष्ट्रातील जनतेला सुरक्षित वाटावे यासाठी आमचे सरकार गृह मंत्रालयामार्फत अशा सर्व उपाययोजना करेल.
जात जनगणनेच्या प्रश्नावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आम्ही पहिल्यापासूनच जात जनगणनेच्या विरोधात नाही, असे आम्ही वारंवार स्पष्ट केले आहे, बिहारचे काम आमच्या पाठिंब्याने झाले. जातीला शस्त्र बनवू नका, असे आपण नेहमी म्हणतो, जनगणना करायचीच असेल तर आधी त्यातून आपल्याला काय साध्य करायचे आहे हे ठरवावे लागेल आणि त्यानुसार काम करावे लागेल. त्याला राजकीय शस्त्र बनवण्याचा प्रयत्न झाला तर मात्र समाजात वितुष्ट येईल.