महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीने काल अखेर १२ दिवसांनी सरकार स्थापन केले महाराष्ट्र राज्याचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून भाजप नेते ‘देवेंद्र फडणवीस’ यांनी काल मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे.हा शपथविधी सोहळा मुंबईत आझाद मैदानावर पार पडला. या शपथविधी सोहळ्याला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह देशभरातील अनेक दिग्गज नेते आणि कलाकार उपस्थित होते. मात्र, या सोहळ्याकडे विरोधकांनी पाठ फिरवल्याचे पाहायला मिळाले. आता यावरुनच भाजपाने विरोधकांवर निशाणा साधला आहे.
शपथविधी सोहळ्याला विरोधकांनी पाठ फिरवल्याने आता भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत विरोधकांना चांगलाच सुनावले आहे. पोस्ट मध्ये केशव उपाध्ये म्हणाले कि, ‘हिच तर महाराष्ट्रविरोधी कोती मनोवृत्ती, काल आझाद मैदानावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा तर एकनाथ शिंदे व अजित पवार यांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला. या समारंभापासून व्यक्तीगत आमंत्रण देऊनही उद्धव ठाकरे आणि शरद पवार व कॉग्रेसचे नेते गैरहजर राहिले. हा लोकांनी निवडून दिलेल्या सरकारचा शपथविधी होता. लोकशाहीत लोकांनी दिलेला कौल स्वीकारून है नेते शपथविधीला आले असते तर खरंच या नेत्यांना महाराष्ट्र हिताची व संविधानाची चाड आहे असा अर्थ निघाला असता. महाराष्ट्राचा विकासासाठी आम्ही एक आहोत असा संदेश दिला गेला असता.
पुढे म्हणाले कि, २०१९ मध्ये उध्दव ठाकरे यांनी लोकांचा विश्वासघात करीत मविआसोबत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हा त्या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस व तत्कालिन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील उपस्थित होते. निवडणुका संपल्या आता विकासासाठी आपण एक आहोत हा संदेश देता आला असता. मात्र पक्षीय स्वार्थापलीकडे आम्ही काहीच पाहू शकत नाही, महाराष्ट्राच्या हिताचा कोरड्या गप्पा मारतो व वेळ आली तर विरोधातच हेच या निमित्ताने या मंडळींनी दाखवून दिले. या आशयाची पोस्ट त्यांनी केली आहे. आता या पोस्टवर विरोधक काय प्रत्युत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.