विधानसभा निवडणुकांमध्ये मध्ये झालेल्या धक्कादायक पराभवानंतर आणखी एक जोराचा झटका माविआला बसणार आहे. विधानसभेतल्या पराभवाचे खापर महाविकास आघाडीवर फोडत मित्र पक्षाने माविआ मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. विधिमंडळाचे विशेष अधिवेशन सुरु आहे आणि अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असणाऱ्या समाजवादी पार्टीने त्यांची साथ सोडली आहे. शिवाजीनगर- मानखुर्द विधानसभा मतदारसंघाचे आमदार अबू असीम आझमी यांनी माध्यमांसमोर बोलत असताना ही घोषणा केली आहे.
आज विधिमंडळ अधिवेशनादरम्यान विधानसभा निवडणुकीतील निकालावर संशय व्यक्त करत महाविकास आघाडीच्या नवनिर्वाचित आमदारांनी आमदारकीची शपथ घेतली नाही. पण अबू आझमी यांनी मात्र विधानसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली आहे.
महाविकास आघाडी विधानसभेत का हरली याबाबतही अबू आझमी यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले आहेत की, या निवडणुकीच्या काळात महाविकास आघाडीमध्ये समन्वय नव्हता. कोणत्याही प्रकारचा समन्वय महाविकास आघाडीमध्ये या निवडणुकीत पाहायला मिळाल नाही. कोणत्याही निवडणुकीला आघाडी म्हणून सामोरं जात असताना एकवाक्यता गरजेची आहे. तसेच कोणत्याही पक्षाचा नेता निवडणूक लढत असेल तर त्याला आपला नेता- उमेदवार समजले गेले पाहिजे, पण तसे चित्र या आघाडीमध्ये दिसले नाही असे आझमी म्हणाले आहेत.
अबू आझमी यांनी शिवसेनेच्या आणि विशेष करून उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. विधानसभेची निवडणूक हारल्यानंतर त्यांनी असं म्हटलं की आमचा हिंदुत्वाचा मुद्दा कायम असेल. सगळ्या धर्माच्या लोकांना सोबत घेऊन चालण्याचा विचार उद्धव ठाकरे यांनी मांडला नाही. त्यामुळे आमचा त्या भूमिकेला विरोध आहे. आता काँग्रेस आणि शरद पवारांच्या गटाने त्यांना शिवसेनेसोबत राहायचे आहे की नाही हे ठरवायला हवे असे मतही त्यांनी मांडले आहे.