महाराष्ट्र विधीमंडळाच्या विशेष हंगामी अधिवेशनाला आजपासून (७ डिसेंबर) सुरुवात झाली. १७३ जणांनी सभागृहात आमदारकीची शपथ घेतली आहे मात्र ‘ईव्हीएम्’ मशिनचे कारण पुढे करत विरोधकांनी सभात्याग केला. त्यामुळे महाविकास आघाडीमधील निवडून आलेल्या एकाही लोकप्रतिनिधीने आमदारकीची शपथ घेतली नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी सत्तापक्षातील लोकप्रतिनिधींना आमदारकीची शपथ दिली आहे.
सकाळी ११ वाजता ‘वन्दे मातरम्’ आणि ‘महाराष्ट्र गीत’ झाल्यावर विधीमंडळाचे विशेष अधिवेशन सुरू झाले. या वेळी महायुतीमधील आमदारांनी सभागृहात ‘जय श्रीराम’, ‘जय भवानी’, ‘जय शिवाजी’ या घोषणा दिल्या. सभागृहाला प्रारंभ झाल्यावर हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी राज्यपालांनी त्यांना अस्थायी अध्यक्षपदी नियुक्त केल्याचे पत्र वाचून दाखवले. विधानसभेच्या स्थायी अध्यक्षपदाची निवड ९ डिसेंबर या दिवशी होणार असल्याचा राज्यपालांचा संदेश वाचून दाखवला. यानंतर सभागृहात आमदारकीच्या शपथ सोहळ्याचा मुख्य कार्यक्रम चालू झाला. अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी नावांची घोषणा केल्यानुसार लोकप्रतिनिधींनी अध्यक्षांच्या आसनाजवळ येऊन आमदारकीची शपथ घेतली. भाजपचे आमदार चैनसुख संचेती यांनी पहिली शपथ घेतली. विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५ व्या क्रमांकाला, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनुक्रमे ६ आणि ७ व्या क्रमांकाला शपथ घेतली. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची शपथ झाल्यावर महायुतीमधील आमदारांनी सभागृहात ‘जय श्रीराम’ ‘जय भवानी, जय भवानी’ या घोषणा दिल्या.
भाजपच्या ७ आमदारांनी घेतली संस्कृतमध्ये शपथ !
भाजपचे आमदार गिरीश महाजन, सीमा हिरे, प्रशांत ठाकूर, सुधीर गाडगीळ, नीतेश राणे, प्रसाद अडसर, राम कदम यांनी संस्कृतमध्ये शपथ घेतली.
१५६ लोकप्रतिनिधींनी घेतली ईश्वरसाक्षीने शपथ !
१७३ पैकी १५६ लोकप्रतिनिधींनी ‘ईश्वरसाक्षीने शपथ घेतली. १२ जणांनी ‘गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो’, असे म्हणाले, तर ५ मुसलमान आमदारांनी अल्लाला साक्ष मानून शपथ घेतली. तर उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ, धर्मराव अत्राम, नमिता मुंडदा, प्रदीप जैस्वाल आदींनी ‘गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो’ असे म्हणत शपथ घेतल्याचे दिसून आले.
पाच भाषांमध्ये घेण्यात आली शपथ !
१७३ आमदारांच्या शपथविधीमध्ये १६० जणांनी मराठी भाषेत, ७ जणांनी संस्कृत, २ जणांनी हिंदी, तर सिंधी आणि उर्दू भाषेत प्रत्येकी एका लोकप्रतिनिधीने शपथ घेतली. समाजवादी पक्षाचे अबू आझमी आणि भाजपचे पराग शाह यांनी हिंदी भाषेत शपथ घेतली. भाजपचे कुमार आयलानी यांनी सिंधी, तर समाजवादी पक्षाचे मुफ्ती अहमद खालिद यांनी उर्दूमध्ये शपथ घेतली.
११४ आमदार उद्या घेणार शपथ !
७ डिसेंबर या दिवशी एकूण २०० लोकप्रतिनिधींचा शपथविधी होणार होता. त्यानुसार क्रमांकही निश्चित करण्यात आला होता; मात्र काही लोकप्रतिनिधी अनुपस्थित होते, तर काहींना सभागृहात येण्यास विलंब झाला. त्यामुळे १७३ जणांनाच आमदारकीची शपथ देण्यात आली. उर्वरित ११४ आमदारांना रविवारी (८ डिसेंबर) आमदारकीची शपथ घ्यावी लागणार आहे.