मध्य-पूर्वेतील देश सीरिया हा देश पुन्हा एकदा चर्चेत आला असून या देशात आता पूर्णपणे सत्तांतर झाले आहे. या देशावर आता बंडखोरांनी कब्जा केला आहे. राजधानीत सर्वच बाजूने बंडखोर घुसले आहेत. तसेच राष्ट्रपती बशर अल-असद हे देश सोडून गेले आहेत. बांग्लादेशात सत्तापलट झाल्यानंतर शेख हसीना यांच्या घरात जसे लोक घुसले होते. तसाच प्रकार आता सीरियात घडला आहे. सीरियातील लोक दमिश्क येथील राष्ट्रपती भवनात घुसले असून त्यांनी असद महलमधून जे मिळेल ते लुटून नेले आहे.
असद यांच्या सरकारचा अंत झाल्याचे आणि सर्व कैद्यांना मुक्त केल्याचे सरकारी दूरचित्रवाणीवरुन जाहीर करण्यात आले आहे. राजधानी दमिश्कच्या रस्त्यावर आणि चौकात लोक जल्लोष करताना दिसत आहेत.जोपर्यंत सत्ता परिवर्तन होत नाही.तोपर्यंत देशाचे सरकार पंतप्रधान चालवतील असे सीरियातील विरोधी पक्षाच्या सैन्य मोहीम प्रशासनाने म्हटले आहे.
हयात तहरीर अल-शाम असे या बंडखोरांच्या गटाचे नाव आहे.आणि देशात तख्तापलट घडवून आणणारा नेता म्हणून या संघटनेचा अबू मोहम्मद अल जुलानी हा समोर आला आहे.तो आधी अल-कायदा या दहशतवादी संघटनेत होता. त्याच्यावर अमेरिकेने वर्ष 2017 मध्ये 84 कोटी 67 लाख रूपयांचे बक्षिस ठेवले होते.
सीरियातील इदलिब हा या बंडखोर, दहशतवाद्यांचा अड्डा असून तिथे त्यांचा दबदबा असलयाचे सांगितले जाते. संपूर्ण सीरियावर कब्जा करण्याचे त्यांचे अनेक वर्षांपासूनचे प्रयत्न होते. अल-जुलानी ने संघटनेत प्रवेश केल्यानंतर 2017 मध्ये हजारो तरुण त्याच्या आवाहनानंतर या ठिकाणी आले. तसेच त्याने अनेक छोटे-मोठे गट त्याच्या संघटनेत सामावून घेतले. तेव्हापासून तो सीरियावर कब्जा करण्याची योजना आखत होता. इराणचे तरुणांना देशाबाहेर काढणे आणि सीरियात इस्लामिक कायदा लागू करण्याचा त्याचा उद्देश असल्याचे सांगितले जाते.