काल रात्री मुंबईतील कुर्ला परिसरात बेस्ट बसने अनेक वाहने आणि नागरिकांना धडक दिली आहे.या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे, तर 25 जण जखमी झाले आहेत. जखमींना सायन आणि कुर्ला भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
प्राथमिक तपासात ब्रेक फेल झाल्याने सरकारी बसने लोकांना चिरडल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. बसचा मेन्टेनन्स रिपोर्ट तज्ञांकडून घेतला जाईल. ही बस कुर्ल्याहून अंधेरीच्या दिशेने जात असताना कुर्ला परिसरातील एलबीएस रोडवर भरधाव बस मार्केटमध्ये घुसल्याने हा भीषण अपघात झाला. दरम्यान तपासासाठी फॉरेन्सिक टीमही अपघाताच्या ठिकाणी पोहोचली आहे.
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, अचानक एक वेगवान बस बाजारात येताना दिसली, त्यानंतर लोकांमध्ये आरडाओरडा झाला. लोक वाचण्यासाठी पळू लागले पण बसने काही वाहने आणि लोकांना चिरडले. बसचालक नशेत असल्याचेही लोकांनी पोलिसांना सांगितले. पोलिसांनी घटनास्थळावरून जमाव हटवून बस चालकाला ताब्यात घेतले आहे .
सध्या मुंबई महानगरपालिकेचे (BMC) पथक घटनास्थळी मदतकार्यात गुंतले आहे. बीएमसीने अपघातातील जखमी आणि मृतांच्या अधिकृत आकडेवारीची माहिती दिली असून त्यानुसार २५ जण जखमी झाले आहेत, तर चार जणांचा मृत्यू झाला आहे.