विधिमंडळाच्या तीन दिवसांच्या विशेष अधिवेशनाचे काल सूप वाजले. त्यापूर्वी नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नागपूरमधील हिवाळी अधिवेशनाच्या तारखांची घोषणा केली आहे. राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये 16 ते 21 डिसेंबर या काळात होणार आहे.
विधानभवन येथे विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
या बैठकीला विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, यांच्यासह कामकाज सल्लागार समितीचे सदस्य, विधिमंडळ सचिव जितेंद्र भोळे आदी मान्यवर उपस्थित होते.
या वर्षीच्या हिवाळी अधिवेशनाचे वैशिष्ट्य म्हणजे यंदाचे अधिवेशन पेपरलेस होणार आहे. यासाठी दोन्ही सभागृहांतील प्रत्येक सदस्याच्या आसनासमोर डिजिटल स्क्रीन बसवण्यात आले आहेत. कामकाजाच्या क्रमापासून प्रश्नोत्तरे, लक्षवेधी सूचना आता कागदावर नव्हे तर लॅपटॉपच्या स्क्रीनवर दिसतील.अधिवेशनाची सर्व तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. विधान परिषद आणि विधानसभा सभागृहातील प्रत्येक आमदाराच्या टेबलावर डिजिटल स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली आहे.
दरम्यान नागपूरमधील अधिवेशनाची तयारी पूर्ण करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. 12 डिसेंबरपासून संपूर्ण सचिवालय मुंबईतून नागपूरमध्ये दाखल होईल, अशी माहितीही समोर येत आहे.