काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधकांनी आज, मंगळवारी राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्याविरोधात अविश्वास प्रस्तावाची नोटीस दिली आहे . ही नोटीस राज्यसभेचे महासचिव पीसी मोदी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली आहे. विरोधी पक्षातील सुमारे 60 खासदारांनी नोटीसवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी अध्यक्ष धनखड यांच्यावर पक्षपाताचा आरोप केला आहे.
या अविश्वास प्रस्तावाला काँग्रेसला आरजेडी, तृणमूल काँग्रेस, सीपीआय, सीपीआयएम, झारखंड मुक्ती मोर्चा, आम आदमी पार्टी आणि डीएमके यांचा पाठिंबा आहे. नोटीसवर जवळपास 60 विरोधी खासदारांच्या सह्या आहेत. काँग्रेस खासदार दिग्विजय सिंह यांनी राज्यसभेच्या अध्यक्षांवर पक्षपाताचा आरोप केला आहे.तर तृणमूल नेत्या सागरिका घोष म्हणाल्या आहेत की , “आम्ही राज्यसभेतून वॉकआऊट केले आहे. आमच्या घटनात्मक अधिकारांचा पाठपुरावा करण्यासाठी, घटनात्मक संसदीय लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी, आम्हाला जे हक्क हवे आहेत .त्यासाठी आम्ही हे करत आहोत.विरोधकांना लोकांचे प्रश्न मांडू दिले जात नाहीत.
राज्यसभेच्या अध्यक्षाविरुद्ध घटनेच्या कलम 67(बी) नुसार अविश्वास प्रस्ताव आणला जातो. या अंतर्गत, राज्यसभेतील तत्कालीन सर्व सदस्यांच्या बहुमताने आणि लोकसभेच्या संमतीने मंजूर झालेल्या ठरावाने अध्यक्षांना हटवता येते. परंतु 14 दिवस अगोदर नोटीस देणे आवश्यक आहे. यापूर्वी ऑगस्ट महिन्यातही काँग्रेससह विरोधी पक्षांनी अध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याची योजना आखली होती. मात्र नंतर काही कारणास्तव ते पुढे ढकलण्यात आले होते.
इंडिया आघाडीमध्ये असणाऱ्या सपा आणि टीएमसीनेही अविश्वास प्रस्तावावर स्वाक्षरी केली आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून दोन्ही पक्षांनी संसदेबाहेर चालू असलेल्या विरोधकांच्या निदर्शनात भाग घेतलेला नाही.
सोमवारी राज्यसभेत जॉर्ज सोरोस यांच्या मुद्द्यावरून झालेल्या गदारोळात अध्यक्ष जगदीप धनखड यांची भूमिका पाहता काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांचे सदस्य अध्यक्ष जगदीप धनखड यांच्यावर नाराज असल्याचे सांगितले जात आहे.