ठाणे जिल्ह्यातल्या कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्यासंदर्भांत कल्याण न्यायालयाने आज महत्वपूर्ण निकाल दिला आहे. किल्ल्यावर मंदिर की मशीद? या संदर्भात निर्णय देत दुर्गाडी किल्ल्यावर मंदिरच असल्याचा निर्वाळा न्यायालयाने केला आहे. मागील ४८ वर्षांपासून या प्रकरणावर सुनावणी सुरु होती. अखेर या प्रकरणाचा निकाल आता लागला आहे.
मुस्लिम पक्षाच्या वतीने सर्फउद्दिन कर्ते यांनी दुर्गाडी किल्ला मुस्लिम पक्षाच्या ताब्यात द्या, अशी मागणी केली होती. 1976 पासून कल्याण न्यायालयात या प्रकरणी सुनावणी सुरु होती. दरम्यान 48 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर कोर्टाने शासनाच्या बाजूने निकाल दिला आहे. कल्याणमधील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर मंदिर आहे, हा शासनाचा त्यावेळचा निर्णय मान्य करत कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाचे वरिष्ठ विभागाचे न्यायाधिश ए. एस. लांजेवार यांनी दुर्गाडी किल्ल्यावरील मंदिराचा दावा मान्य केला आहे. तसेच हे प्रकरण कल्याण न्यायालयातून वक्फ बोर्डाकडे वर्ग करण्याचा अन्य धर्मियांचा दावा न्यायालयाने फेटाळला आहे. यानंतर कल्याणमध्ये शिवसेना कार्यकर्ते आणि हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आरती करत उत्साह साजरा केला आहे.
अनेकदा या भागामध्ये धार्मिक तणाव निर्माण करणाऱ्या या प्रकरणावर निकाल लागल्याने आता हा वाद शांत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. गेल्या काही वर्षांपासून बकरी ईदनिमित्त मुस्लिम समाज दुर्गाडी किल्ला या परिसरात असलेल्या मशिदीत नमाज अदा करण्यासाठी जात असे. त्यामुळे बकरी ईदच्या दिवशी कल्याणच्या दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी बंदी घातली जाते. त्याच्या निषेधार्थ या ठिकाणी हिंदुत्ववादी संघटनांनी मोठ्या प्रमाणावर आंदोलने केली होती.
या वर्षी जून महिन्यात बकरी ईदनिमित्त मंदिर बंद ठेवल्यानंतर शिवसेना आणि उबाठा या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी दुर्गाडी किल्ल्याबाहेर घंटानाद आंदोलन केले होते. आम्हाला मंदिरात प्रवेश दिला जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहिल अशीही भूमिका घेतली होती.90 च्या दशकात आनंद दिघेंनी याचा विरोध करत या ठिकाणी घंटानाद आंदोलन सुरु केले होते. यावर्षीही या ठिकाणी घंटानाद आंदोलन करण्यात आले होते.