बांगलादेशातून भारतात येणा-या घुसखोरांचा मुद्दा अनेकदा चर्चेत असतो. नुकत्याच भारतीय हद्दीत बेकायदेशीररित्या मासे पकडण्यासाठी आलेल्या 2 बांगलादेशी मासेमारी नौका ताब्यात घेतल्या आहेत. तसेच, 78 मच्छिमारांना भारतीय तटरक्षक दलाने अटक केली आहे. हे सर्व मच्छिमार बांगलादेशचे रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.
भारतीय तटरक्षक दलाने या संदर्भातली माहिती समाज माध्यमांवर जाहीर केली आहे. भारतीय तटरक्षक दलाची जहाजे आंतरराष्ट्रीय सागरी सीमेजवळ नेहमीप्रमाणे गस्त घालत होते. या गस्तीदरम्यान, भारतीय सागरी क्षेत्रात काही संशयास्पद हालचाली त्यांना जाणवल्या.
In a swift operation, @IndiaCoastGuard apprehended two #Bangladeshi fishing trawlers along with 78 crew for unauthorised fishing in #Indian waters. The vessels have been brought to #Paradip for legal proceedings. #MaritimeSecurity #WeProtect pic.twitter.com/DQDuEANNfZ
— Indian Coast Guard (@IndiaCoastGuard) December 10, 2024
तपासादरम्यान बांगलादेशातील दोन मासेमारी करणाऱ्या नौका, एफव्ही लैला– 2 आणि एफव्ही मेघना–5 या कोणत्याही परवानगीशिवाय भारतीय हद्दीत घुसल्याचे लक्षात आले. या दोन्ही नौकांची नोंदणी बांगलादेशात झाली आहे. आणि त्यात अनुक्रमे 41 आणि 37 एवढे मच्छीमार होते. भारतीय तटरक्षक दलाने तात्काळ कारवाई करत या दोन्ही नौका अडवल्या आणि त्याचा तपास केला. यातून पकडलेल्या मच्छीमारांना पुढील कारवाईसाठी संबंधित अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
भारतीय तटरक्षक दलाने ही मोहीम यशस्वी झाल्याचे म्हटले आहे. भारतीय सागरी संपत्तीसाठी ही कारवाई जेवढी महत्त्वाची आहे, तेवढीच बेकायदेशीर हालचालींवर लक्ष ठेवण्याच्या दृष्टीने देखील ही मोहीम महत्त्वाची आहे. बेकायदेशीर कारवायांना आळा घालण्यासाठी अशाप्रकारे गस्त आणि कारवाई भविष्यात देखील केली जाईल.