महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून दोन आठवड्यांपेक्षा जास्त कालावधी उलटला आहे. राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या निकालात महायुतीला बहुमत आहे. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तर उपमुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची वर्णी लागली. मात्र या शपथविधी सोहळ्यानंतर लगेचच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असे सांगितले जात होते. पण अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. त्यामुळे खातेवाटप कधी होणार, मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
येत्या १४ तारखेला राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. असे खात्रीदायक रित्या सांगितले जात आहे. त्या आधी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्र्याची यादी दिल्लीत पाठवल्याची माहिती मिळते आहे. येत्या १६ तारखेला हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरु होत आहे. त्यापूर्वी १४ तारखेला मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. त्यासाठी शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीची यादी अंतिम शिक्कामोर्तबसाठी दिल्लीला पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
प्राथमिक माहिती नुसार देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार आज दुपारी दिल्लीला रवाना होतील. हे तिन्ही नेते दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि जे. पी. नड्डा यांची भेट घेणार आहेत. ही सदिच्छा भेट असली तरी या भेटीदरम्यान राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज दिल्लीतील या गाठीभेटींमध्ये राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय होतील असे सांगितले जात आहे.
दिल्लीला जाण्याआधी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट याच विषया संदर्भात झाल्याचे सांगण्यात येत आहे.याच संदर्भात महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. ठाण्यात शिंदे यांच्या घरी 2 तास बैठक चालली होती. तर एकीकडे एकनाथ शिंदे हे गृहखात्यासाठी आग्रही असल्याचे बोलले जात आहे. पण भारतीय जनता पक्ष गृहखाते शिवसेनेला देण्यास तयार नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार लांबला असल्याचे कारण पुढे येत आहे.
दरम्यान महाराष्ट्रामध्ये लवकरच भाजपाकडून ऑपरेशन लोटस राबवले जाण्याची दाट शक्यता असल्याचे सांगितले जात आहे. यासंदर्भातील काही धक्कादायक खुलासे भाजपाच्या वरिष्ठ नेत्याने केल्याचे सांगितले जात आहे. महाविकास आघाडीचे काही खासदार भारतीय जनता पार्टीच्या संपर्कात असल्याचे या बड्या नेत्याने सांगितले आहे.