दिल्ली विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्या असून यासाठी राजधानीत राजकीय हालचालींना वेग आला आहे. दरम्यान, दिल्लीत आप आणि काँग्रेस यांची युती होईल का या चर्चांना आता स्वतः आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी पूर्णविराम दिला आहे. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपला पक्ष दिल्लीची विधानसभा निवडणूक एकटेच लढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. आम आदमी पार्टी (आप) काँग्रेसशी युती करणार नसल्याचे केजरीवाल यांनी आज, बुधवारी अधिकृतपणे जाहीर केले आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विटरवर (एक्स) पोस्ट शेअर करत स्वबळावर निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
Aam aadmi party will be fighting this election on its own strength in Delhi. There is no possibility of any alliance with congress. https://t.co/NgDUgQ8RDo
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) December 11, 2024
यासंदर्भातील आपल्या पोस्टमध्ये केजरीवाल म्हणाले की, आम आदमी पार्टी ही निवडणूक स्वबळावर लढणार आहे. काँग्रेससोबत कोणतीही युती होण्याची शक्यता नाही. यापूर्वी 7 डिसेंबर रोजी दिल्ली प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष देवेंद्र यादव यांनी आम आदमी पार्टी (आप) आणि राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यावर राष्ट्रीय राजधानीतील कायदा आणि सुव्यवस्थेच्या “बिघडलेल्या” परिस्थितीला जबाबदार असल्याची टीका केली होती. केजरीवाल यांनी ज्याप्रमाणे निर्भया प्रकरणाच्या वेळी माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचा राजीनामा मागितला होता. त्याचप्रमाणे दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांचा राजीनामा मागितला पाहिजे, अशी मागणीही देवेंद्र यादव यांनी केली होती.दिल्ली काँग्रेस अध्यक्षांनी पुढे आरोप केला की, दिल्लीमध्ये सध्या महिलांना टोळीयुद्ध, गोळीबार, खून, बलात्कार, छळ आणि छेडछाडीच्या घटनांसह वाढत्या गुन्ह्यांचा सामना करावा लागत आहे.
काँग्रेसच्या या टीकेनंतर केजरीवाल यांनी काँग्रेसशी निवडणुकीत युती करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. यासोबतच केजरीवाल यांच्या ट्विट नंतर आपचे खासदार राघव चढ्ढा यांनी सांगितले की, यापूर्वी देखील आम्ही स्वबळावर दिल्लीत निवडणूक लढलो आणि प्रचंड बहुमताने विजयी झालो. त्यामुळे निवडणुकीत कुणाशी युती करण्याचा प्रश्नच निर्माण होत नसल्याचे चढ्ढा यांनी स्पष्ट केले आहे.
२०१५ पासून दिल्लीत आप सत्तेत आहे.तसेच दिल्लीत पुन्हा सत्तेत येण्यासाठी काँग्रेस उत्सुक आहे. लोकसभा निवडणुकीसाठी यापूर्वी आम आदमी पक्ष आणि काँग्रेसमध्ये करार झाला होता. पण हा करार दोन्ही पक्षांनी जसा विचार केला होता तेवढा प्रत्यक्षात आला नाही.दरम्यान, काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीनंतर दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष देवेंद्र यादव यांनी त्यांचा पक्ष सर्व जागांवर एकट्याने निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले होते. लोकसभा निवडणुकीत झालेल्या आप सोबतच्या कराराला त्यांनी चूक म्हटले होते. आपला पक्ष पुन्हा चूक करणार नाही, असेही ते म्हणाले होते