संजय मल्होत्रा यांची भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) चे २६ वे गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी आजपासून म्हणजेच ११ डिसेंबरपासून आरबीआयच्या गव्हर्नरपदाचा कार्यभार स्वीकारला आहे.नवनिर्वाचित संजय मल्होत्रा यांनी माजी गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्या जागेवर नियुक्ती करण्यात आली आहे. शक्तिकांत दास यांनी 6 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करत मंगळवारी हे पद रिक्त केले.आरबीआयने दिलेल्या निवेदनात संजय मल्होत्रा पुढील तीन वर्षांसाठी आरबीआयचे गव्हर्नरपद सांभाळतील,असे म्हटले आहे.
आपला कार्यभार स्वीकारण्यापूर्वी संजय मल्होत्रा यांनी मंगळवारी सांगितले होते की, 11 डिसेंबर रोजी आरबीआय गव्हर्नर म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर ते सर्व विचार समजून घेण्याचा आणि अर्थव्यवस्थेसाठी सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न करतील. तसेच त्यांचा असा विश्वास आहे की केवळ देशाच्या मध्यवर्ती बँकेद्वारे किंमती व्यवस्थापित करणे शक्य नाही, यासाठी सरकारी मदतीची देखील आवश्यकता आहे.
जाणून घ्या कोण आहेत संजय मल्होत्रा?
संजय मल्होत्रा हे 1990 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. ते मूळचे राजस्थानचे आहेत .2022 मध्ये त्यांची महसूल विभागात नियुक्ती झाली. त्यापूर्वी त्यांनी वित्त सेवा विभागातही काम केले होते. संजय मल्होत्रा यांनी आरईसी लिमिटेड कंपनीत एमडी आणि चेअरपर्सन पद भूषवले आहे. मोदी सरकारच्या बजेट प्रक्रियेत कर महसूल वाढवण्याची जबाबदारी संजय मल्होत्रा यांच्या खांद्यावर होती.
रेपो दरात बदल होण्याची शक्यता
विश्लेषकांचे म्हणणे आहे की संजय मल्होत्रा गव्हर्नर बनताच रेपो दरात घसरण होऊ शकते. गेल्या वर्षी म्हणजेच फेब्रुवारी २०२३ मध्ये रेपो दरात शेवटच्या वेळी कपात करण्यात आली होती. नुकत्याच झालेल्या ३ दिवसीय एमपीसीच्या बैठकीतही रेपो दरात कोणताही बदल झालेला नाही. सध्या रेपो दर ६.५ टक्के आहे.