परभणीत काही समाजकंटकांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ भारतीय संविधानाची तोडफोड केली आहे. यानंतर वातावरण चांगलेच पेटले असून यानंतर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आक्रमक झाले आहेत. त्यांनी हल्लेखोरांना अटक करा अन्यथा परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला आहे येत्या 24 तासांत प्रशासनाने सर्व हल्लेखोर समाजकंटकांना अटक केली नाही तर त्याचे परिणाम भोगावे लागतील,असे म्हणत ही गोष्ट अत्यंत लाजिरवाणी असल्याचेही म्हटले आहे.
परभणीतील संविधान पुस्तिकेच्या विटंबनेनंतर आज परभणी बंदची हाक देण्यात आली होती.मात्र त्याला हिंसक वळण लागले असून आंदोलकांनी बंद दुकानावर दगडफेक केली आहे. तसेच पोलिसांच्या गाड्यांवरही दगडफेक करण्यात आली आहे तसेच काही गाड्यांची मोडतोडही आंदोलकांकडून करण्यात आली. यानंतर आता पोलिसांनी ॲक्शन मोडवर आल्याचे दिसून आले. पोलिसांनीही या आंदोलकांवर सौम्य लाठीचार्ज केल्याचे पाहायला मिळाले. यानंतर शहरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
परभणी नांदेड महामार्ग सध्या पूर्णपणे ठप्प झाला आहे. तसेच परभणीत जमावबंदीचे आदेश लागू करुन या शहरात इंटरनेट सेवाही बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. संविधानाचा अवमान करणाऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी आंदोलकांची मागणी आहे.