बांगलादेशात शेख हसीना सत्तेवर होत्या तोपर्यंत हिंदू सुरक्षित होते. मात्र मोहम्मद युनूस यांनी सत्ता हाती घेताच हिंदूंवर हल्ले सुरू केले. हिंदूंना लक्ष्य केले जाऊ लागले. बांगलादेशात अल्पसंख्याक असणे ,हिंदू असणे हा गुन्हा ठरला. बांगलादेशात हिंदूंवर अनेक अत्याचार झाले. त्याचे पडसाद जगभर ऐकू आले. पण हट्टी बांगलादेश आजवर गप्प बसला होता. मात्र भारताने तीव्र आक्षेप नोंदवून जाब विचारल्यानंतर बांगलादेशला खरे बोलणे भाग पडले. आणि अखेर बांगलादेशने शेख हसीना यांना हटवल्यानंतर अल्पसंख्याकांवर, विशेषत: हिंदूंविरुद्ध झालेल्या हिंसाचाराच्या ८८ घटनांची कबुली दिली आहे.
भारतासह इतर देशांनी हिंदूंवर आणि अल्पसंख्याकांवर होत असलेल्या अत्याचाराच्या घटनांबाबत चिंता व्यक्त करत कारवाई करण्याचे मागणी बांगलादेश सरकारकडे केली होती. हिंदुंवरील अत्याचाराविरुद्ध देशासह राज्यातही निदर्शने आंदोलने होत आहेत. मात्र, बांगलादेशच्या अंतरिम सरकारने आतापर्यंत कोणतीही कारवाई केलेली नाही, अथवा हिंदूंच्या संरक्षणाची हमी देखील दिली नाही. यावरून संताप व्यक्त केला जात आहे.
अखेर बांगलादेशने मंगळवारी कबूल केले की ऑगस्टमध्ये तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांची हकालपट्टी केल्यानंतर अल्पसंख्याकांवर, प्रामुख्याने हिंदूंविरुद्ध जातीय हिंसाचाराच्या ८८ घटना घडल्या आहेत, मात्र, याही वेळी बांगलादेशने स्वतःची पाठ थोपटण्याची एकही संधी सोडली नाही. उलट असे म्हंटले आहे की, हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराची जगाला जाणीव आहे. तसेच बांगलादेशचे युनूस सरकार ही जागे आहे. अंतरिम सरकारचे प्रमुख मुहम्मद युनूस यांचे प्रेस सचिव शफीकुल आलम यांनी सांगितले की, या घटनांमध्ये ७० जणांना अटक करण्यात आली आहे.
भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी बांगलादेशी नेतृत्वासोबतच्या बैठकीदरम्यान, अल्पसंख्यांकांवरील हल्ल्यांच्या खेदजनक घटना आणि अल्पसंख्याकांच्या सुरक्षेबाबत भारताची चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर शफीकुल आलम, मुहम्मद युनूसचे प्रेस सचिव यांनी ही कबुली देत पत्रकारांना सांगितले की, ५ ऑगस्ट ते २२ ऑक्टोबर या कालावधीत अल्पसंख्याकांशी संबंधित घटनांमध्ये एकूण ८८ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच या घटनांमध्ये ७० जणांना अटक करण्यात आली आहे.
तसेच या प्रकरणात ‘उत्तर-पूर्व सुनमगंज, मध्य गाझीपूर आणि इतर भागातही हिंसाचाराची नवीन प्रकरणे समोर आली असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले आहे. आलम म्हणाले आहेत. की, २२ ऑक्टोबरनंतर घडलेल्या या सर्व घटनांचा तपशील लवकरच शेअर केला जाईल.
दरम्यान या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर भारत आणि बांगलादेश यांच्यातील संबंध पूर्णपणे बिघडले आहेत. मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली बांगलादेश आता भारताशी वैर करत आहे. त्यामुळेच आता तणाव शिगेला पोहोचला आहे.