राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या पथकाने (एनआयए) गुरुवारी पहाटे 4 वाजायच्या सुमाराला उत्तरप्रदेशातील झांशीच्या मुकरायना परिसरात मदरसा संचालक मुफ्ती खालिद याच्या घरी छापा टाकला. परदेशी निधी प्रकरणाच्या तपासासाठी एनआयएने ही कारवाई केली. पण दरम्यान मुफ्ती समर्थकांनी यावेळी प्रंचड गोंधळ घालून मुफ्तीची सुटका केली. दरम्यान अतिरिक्त कुमक बोलावून एनआयएने मुफ्ती खालिद याला पुन्हा ताब्यात घ्यावे लागले.
झाशीच्या कोतवाली परिसरात असलेल्या सलीम बागेच्या बाहेर दतिया गेट येथे राहणारा खालिद नदवी हा दीनी तालीमचे ऑनलाइन आणि ऑफलाइन वर्ग चालवतो. केंद्रीय तपास यंत्रणेचे पथक गुरुवारी पहाटे येथे पोहोचले. विदेशी निधी प्रकरणात एजन्सीकडे महत्त्वाचे पुरावे आहेत.खालिदच्या घरी येण्यापूर्वी टीम मुकरायना येथील छोटी मस्जिदमध्ये राहणारा मुफ्तीचा नातेवाईक साबीर नदवी याच्या घरीही पोहोचली होती. त्याचीही चौकशी करण्यात आली. सुमारे तासभर चाललेल्या चौकशीनंतर तपास पथकाने त्याला पोलिसांच्या देखरेखीखाली सोडले आणि खालिदच्या ठिकाणी पोहोचले. कारवाईदरम्यान कोणालाही मुफ्ती खालिद यांना भेटू दिले नाही. त्यावर तेथील लोकांनी मशिदीतून घोषणा दिल्या. या घोषणेनंतर मुफ्ती खालिद यांच्या घराबाहेर गर्दी जमली.
जमावाने एकच गोंधळ निर्माण करत मुफ्ती खालिदचीही सुटका केली. मात्र, पथकाने पुन्हा मुफ्ती खालिदला ताब्यात घेतले. या प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेऊन मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. एनआयएचे पथक मुफ्ती खालिद नदवी यांना ताब्यात घेऊन एसपी कार्यालयात पोहोचले. येथे एसपी सुधा सिंह यांच्या नेतृत्वाखालील एनआयए आणि पोलिसांचे पथक त्यांची चौकशी करत आहे.