पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे पोहोचले आहेत. यावेळी ते महाकुंभ-2025 महोत्सवाच्या परिसरात सुरू असलेल्या तयारीची पाहणी करणार आहेत. तसेच महाकुंभाच्या पार्श्वभूमीवर 5500 कोटींहून अधिक खर्चाच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटनही ते करणार आहेत. भारतीय जनता पार्टी (BJP) ने आपल्या X हँडलवर पंतप्रधान मोदींच्या आजच्या कार्यक्रमाची माहिती शेअर केली आहे. भारत सरकारच्या प्रेस आणि इन्फॉर्मेशन ब्युरोने (पीआयबी) पंतप्रधानांच्या प्रयागराज भेटीच्या पूर्वसंध्येला जारी केलेल्या प्रकाशनात संपूर्ण तपशील दिला आहे.
पीआयबीच्या प्रसिद्धीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी 12:15 वाजता प्रयागराजमधील संगमावर प्रार्थना आणि दर्शन घेतले.तसेच अक्षय वटवृक्षाच्या ठिकाणी पूजा केली. आता येथून ते हनुमान मंदिर आणि सरस्वती विहिरीकडे जातील. दुपारी दीड वाजता ते महाकुंभ प्रदर्शन स्थळाला भेट देतील. पंतप्रधान मोदी दुपारी 2 वाजता प्रयागराजमध्ये सुमारे 5500 कोटी रुपये खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि लोकार्पण करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी महाकुंभ 2025 साठी विविध प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत. यामध्ये पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी आणि प्रयागराजमध्ये अखंड कनेक्टिव्हिटी प्रदान करण्यासाठी 10 नवीन रोड ओव्हर ब्रिज (ROB) किंवा उड्डाणपूल, कायमस्वरूपी घाट आणि नदीसमोरील रस्ते यासारख्या विविध रेल्वे आणि रस्ते प्रकल्पांचा समावेश असेल.
यानंतर, गंगा नदीकडे जाणाऱ्या छोट्या नाल्यांवर प्रक्रिया करण्याच्या प्रकल्पांचेही पंतप्रधान उद्घाटन करतील. पिण्याचे पाणी आणि विजेशी संबंधित विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटनही ते करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी मंदिराच्या प्रमुख कॉरिडॉरचे उद्घाटन करणार आहेत. यामध्ये भारद्वाज आश्रम कॉरिडॉर, शृंगवरपूर धाम कॉरिडॉर, अक्षयवत कॉरिडॉर, हनुमान मंदिर कॉरिडॉर इत्यादींचा समावेश आहे. या प्रकल्पांमुळे भाविकांचा प्रवेश सुलभ होईल आणि आध्यात्मिक पर्यटनालाही चालना मिळेल. याशिवाय, कुंभ सहाय्यक चॅटबॉट लॉन्च देखील आज पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे.हा चॅटबॉट भक्तांना महाकुंभ मेळा 2025 बद्दल मार्गदर्शन आणि कार्यक्रमांची नवीनतम माहिती देईल.