साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनला संध्या थिएटरमधील चेंगराचेंगरीप्रकरणी हैदराबादमधील चिक्कडपल्ली पोलिसांनी अटक केली आहे. 4 डिसेंबर रोजी संध्या थिएटरमध्ये ‘पुष्पा 2’ या चित्रपटाचा प्रीमिअर आयोजित करण्यात आला होता. यावेळी अल्लू अर्जुनची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी तुंबड गर्दी केली होती. यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीदरम्यान 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी अल्लू अर्जुनविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली होती.
4 डिसेंबर रोजी ही घटना घडल्यानंतर 5 डिसेंबर रोजी शहर पोलिसांनी अल्लू अर्जुन, त्याची सुरक्षा टीम आणि थिएटर व्यवस्थापनाविरुद्ध चिक्कडपल्ली पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 105 आणि 118 (1) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. मृत महिलेच्या कुटुंबीयांनीही अल्लू अर्जुनविरोधात तक्रार दाखल केली होती. तपासादरम्यान पोलिसांनी थिएटर मालकांपैकी एक, थिएटरचे वरिष्ठ व्यवस्थापक आणि थिएटरच्या खालच्या बाल्कनीचे प्रभारी या तीन जणांना अटक केली. तर अल्लू अर्जुनने एफआयआर रद्द करण्याची याचिका दाखल करत याचिका निकाली निघेपर्यंत अटकेसह पुढील सर्व कारवाईला स्थगिती देण्याची विनंती केली होती. थिएटरमधील चेंगराचेंगरीत एम. रेवती नावाच्या महिलेचा मृत्यू झाला तर तिच्या नऊ वर्षांच्या मुलाची प्रकृती गंभीर आहे.
खरंतर ‘पुष्पा’ या चित्रपटामुळे अल्लू अर्जुनची लोकप्रियता इतकी वाढली होती की सगळे त्याला पाहण्यासाठी तो जिथे आहे तिथे जाऊ लागले. अशात जेव्हा ‘पुष्पा-2’ प्रदर्शित झाला त्यानंतर अल्लू अर्जुन हा चित्रपटाच्या प्रीमियरला पोहोचला. दरम्यान, यावेळी एवढ्या संख्येनं लोक गर्दी करतील अशी अपेक्षी अल्लू अर्जुनला नव्हती. मात्र तो आल्याचे कळताच तिथे लाखोच्या संख्येने लोकांनी गर्दी केली. त्यामुळे ही दुखद घटना घडली आणि त्यात त्या महिलेला तिचा जीव गमवावा लागला. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार आता अल्लू अर्जुनला चिकडपल्ली पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे.