मोदी सरकारच्या ‘आत्मनिर्भर भारत’ उपक्रमाला चालना देण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने 12 सुखोई लढाऊ विमाने (Su-30MKI) खरेदी करण्यासाठी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) सोबत 13,500 कोटी रुपयांचा करार केला आहे .12 सुखोई-30एमकेआय विमानांसह संबंधित उपकरणे मिळवण्यासाठी केलेल्या या करारांतर्गत कर आणि शुल्कांसह सुमारे 13,500 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून गुरुवारी त्यावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. विशेष गोष्ट म्हणजे ही विमाने 62.6% देशी बनावटीची होणार असून भारतीय संरक्षण उद्योग क्षेत्र त्यातील भागांचे उत्पादन करणार आहे.
Su-30MKI ही रशियन विमान निर्माता कंपनी सुखोईने बनवलेली दोन आसनी बहु-भूमिका लांब पल्ल्याची लढाऊ विमाने आहेत. जे आता भारतीय हवाई दलासाठी एचएएलच्या परवान्यानुसार तयार केले जातात.
एचएएलच्या नाशिक विभागात या विमानांचे उत्पादन केले जाणार आहे. या विमानांमुळे भारतीय हवाई दलाच्या कार्यक्षमतेत भर पडणार असून देशाची संरक्षण सज्जता अधिक बळकट होणार आहे.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या मॉस्को भेटीनंतर ही घोषणा करण्यात आली आहे, जिथे त्यांनी दोन्ही देशांमधील संरक्षण संबंध अधिक मजबूत करण्यासाठी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि इतर उच्च अधिकाऱ्यांची भेट घेतली होती.
मोदी सरकारच्या धोरणांमुळे, भारताचे संरक्षण क्षेत्रासाठीचे उत्पादन २०२३-२४ या आर्थिक वर्षात अभूतपूर्व प्रमाणात १.२७ लाख कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, २०१४-१५ मध्ये ४६,४२९ कोटी रुपयांच्या तुलनेत ही सुमारे १७४ टक्क्यांची मोठी वाढ आहे.
या आधी भारत आपल्या संरक्षण गरजांसाठी परदेशांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून होता, सुमारे ६५-७० टक्के संरक्षण उपकरणे आयात केली जात होती. तथापि, आता चित्र बदलले असून सुमारे ६५ टक्के संरक्षण उपकरणे आता भारतातच तयार केली जातात.