कृत्रिम बुद्धिमत्ता कंपनी ओपनएआयच्या (OpenAI ) 26 वर्षीय भारतीय वंशाच्या माजी कर्मचाऱ्याच्या सॅन फ्रान्सिस्कोमध्ये दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या दुःखद घटनेने टेक समुदाय हादरला आहे.
सुचिर बालाजी 26 नोव्हेंबर रोजी त्यांच्या बुकानन स्ट्रीट अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळून आले आहेत OpenAI येथे रिसर्च इंजिनिअर म्हणून काम करत असतांना सुचिर यांनी ओपनएआयच्या कार्यशैलीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले होते आणि नोकरीचा राजीनामा दिला होता. सॅन फ्रान्सिस्को पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुचीर यांचा मृत्यू २६ नोव्हेंबर रोजी झाला असावा मात्र १४ डिसेंबर रोजी ही घटना उघडकीस आली आहे.
सुचीर बालाजी बरेच दिवसांपासून घराबाहेर पडले नव्हते. शिवाय ते त्यांच्या मित्र आणि सहकाऱ्यांच्या फोन कॉललाही उत्तर देत नव्हते. यामुळे काळजी वाटल्यानंतर सुचीरचे मित्र आणि सहकारी त्यांच्या फ्लॅटवर पोहोचले असता त्यांना दरवाजा आतून बंद असल्याचे दिसले. यानंतर त्यांनी सॅन फ्रान्सिस्को पोलिसांना याबाबत माहिती दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दरवाजा तोडून आत जाऊन पाहिले असता बालाजी यांचा मृतदेह आढळून आला. दरम्यान सॅन फ्रान्सिस्को पोलीस विभागाने सांगितले की, प्राथमिक तपासात कोणताही पुरावा आढळला नाही आणि सध्या तरी हे प्रकरण आत्महत्या असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
OpenAI ने अमेरिकेच्या कॉपीराइट कायद्याचे उल्लंघन केले असल्याचा गंभीर आरोप करत सुचीर बालाजी यांनी मृत्यूच्या तीन महिने आधी सार्वजनिक रित्या दावा केला होता. ओपन एआयने चॅटजीपीटी बनवले आहे. जागतिक स्तरावर कोट्यवधी लोक चॅटजीपीटीचा वापर करत आहेत. मात्र त्यांच्या मते हे तंत्रज्ञान समाजासाठी उपयोगी पडण्यापेक्षा अधिक हानी पोहोचवेल.ही मुख्य चिंता होती.तसेच इंटरनेटच्या संपूर्ण इकोसिस्टिमचे नुकसान होईल अशी भिती सुचीर बालाजी यांनी बोलून दाखवली होती.