उत्तरप्रदेशच्या संभल येथे शाही जामा मशिद परिसरात अतिक्रमण आणि वीजचोरीच्या विरोधातील मोहिमेदरम्यान एक प्राचिन मंदिर आढळून आले आहे.हे मंदिर तब्बल 46 वर्षांपासून बंद होते. या मंदिरात शिव शंकर आणि मारुतीच्या प्राचिन मूर्ती आढळून आल्या आहेत. प्रशासनाने हे मंदिर खुले करून त्याची स्वच्छता केली आहे.
संभल येथे 1978 साली हिंदू-मुस्लीम दंगल उसळली होती. त्यानंतर स्थानिक महमूद खा सराय परिसरातून सुमारे 50 हिंदू कुटुंबांनी जीवाच्या भीतीने पळ काढला होता. या परिसरातील एका बंद घरात हे मंदिर आढळून आले आहे. जिल्हाधिकारी राजेंद्र पेन्सिया आणि पोलीस अधीक्षक कृष्ण कुमार बिश्नोई यांच्या देखरेखीखाली मंदिराची स्वच्छता करण्यात आली. घराच्या मालकीबाबत तपास सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी डीएम पेन्सिया यांनी दिली.
संभलमधील शाही जामा मशीद परिसरातील अतिक्रमणे हटवून वीजचोरी रोखण्यासाठी कडक कारवाई सुरू आहे. परिसरातील रस्ते व नाल्यांवरील अतिक्रमणे हटविण्याचे आदेश प्रशासनाच्या पथकाने दिले आहेत. वीज चोरीविरोधातील या मोहिमेत 300हून अधिक घरांमध्ये वीजचोरी आढळून आली. विद्युत विभागाच्या पथकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी या परिसरात पोलिस दलाच्या दोन तुकड्या तैनात केल्या आहेत. प्रशासनाच्या या कडक कारवाईने परिसरात खळबळ उडाली आहे.
जामा मशीद परिसरात वीज चोरीविरोधात आज, शनिवारी राबवलेल्या मोहिमेदरम्यान 46 वर्षांपासून बंद असलेले शिव आणि हनुमानाचे मंदिर सापडले. मंदिरावर अतिक्रमण करून त्याचे घरात रूपांतर करण्यात आले होते. प्रशासनाने मंदिराची स्वच्छता करून घेतली असून अतिक्रमणांवर कडक कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले आहे.
जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र पेनसिया यांनी सांगितले की, या मंदिराची साफसफाई केली जात आहे आणि त्याच्या जवळ असलेल्या एका प्राचीन विहिरीवर रॅम्प बांधण्यात आला आहे. रॅम्प काढल्यानंतर विहीर सापडली आहे. मंदिर त्याच्या हक्काच्या मालकांच्या ताब्यात दिले जाईल. अतिक्रमण करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. यासोबतच पुरातत्व विभागाला (एएसआय) मंदिराची प्राचिनता तपासण्यासाठी कार्बन डेटिंग करण्यास सांगितले असल्याचेही त्यांनी नमूद केले.