राज्यातील महायुती सरकारमधील मंत्रिमंडळाचा विस्तार काल पार पडला. यावेळी महायुतीच्या 39 मंत्र्यांनी शपथ घेतली. यामध्ये 33 कॅबिनेट मंत्र्यांचा तर 6 राज्य मंत्र्यांचा समावेश आहे. यात भाजपचे 19 मंत्री, शिवसेनेचे 11 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या 9 मंत्र्यांचा समावेश आहे.महाराष्ट्रात काल झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता आजपासून विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे
नागपुरात १६ डिसेंबर ते २१ डिसेंबर या कालावधीत हे हिवाळी अधिवेशन पार पडणार आहे. यामध्ये राज्यसरकारकडून २० विधेयके मांडली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरकर असल्याने त्यांच्याकडूनच राज्यातील लोकप्रतिनिधींचे स्वागत होणार आहे. पुढील पाच वर्षांसाठी या अधिवेशनातून विकासाच्या नियोजनाचा रोडमॅप तयार होईल, असे मानले जात आहे.आज सभागृहात नवनिर्वाचित मंत्री आणि सदस्यांचा परिचय करुन दिला जाणार आहे. फडणवीस सरकारचे हे पहिले हिवाळी अधिवेशन अनेक मुद्द्यांनी गाजणार आहे. कापूस, सोयाबीनचे पडलेले दर, ईव्हीएम या मुद्द्यावर विरोधक सत्ताधारी पक्षाला कोंडीत पकडायचा प्रयत्न करतील तसेच विरोधकांना विरोधी पक्षनेतेपद दिले जाणार का? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
राज्यात मिळालेल्या अभूतपूर्व यशामुळे नव्या सरकारकडून असलेल्या अपेक्षांचे ओझे फडणवीसांवर केंद्रीत राहणार आहे. निवडणूकपूर्व सत्तेत असताना अनेक मोठ्या योजनांची घोषणा करण्यात आली होती. त्या योजनेसंदर्भात या अधिवेशनात काही तपशील सांगितले जातील का , याकडे विशेष नजर असणार आहे.
महायुती सरकारच्या स्थापनेनंतर 15 व्या विधानसभेचे नियमित होणारे हे पहिलेच अधिवेशन असणार आहे. या अधिवेशनात लाडकी बहीण योजना, शेतकरी कर्जमाफी, कृषी उत्पादनांसाठी हमीभाव, रोजगार आणि इतर अनेक बाबींबर चर्चा व्हावी, अशी अपेक्षा आहे. तसेच सरकारकडून यावर काहीतरी ठोस निर्णय घेतले जावे, अशीही अपेक्षा राज्यातील जनतेकडून व्यक्त केली जात आहे.