काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी घेतलेली देशाचे माजी पंतप्रधान पंडित नेहरु यांची वैयक्तिक पत्र परत करावीत असे पत्र :पंतप्रधान संग्रहालय आणि ग्रंथालयकडून (PMML) राहुल गांधी यांना पाठवण्यात आले आहे.
देशात 2008 मध्ये काँग्रेस नेतृत्त्वाखाली संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार होते. यावेळी सोनिया गांधी यांनी पंतप्रधान संग्रहालयात असणारी पंडित नेहरु यांची पत्रे मागवली होती. पंडित नेहरूंची ही वैयक्तिक पत्रे ऐतिहासिक मानली जातात. यापूर्वी ही पत्रे जवाहरलाल नेहरू मेमोरिअलकडे होती. १९७१ मध्ये नेहरू मेमोरियल म्युझियम आणि लायब्ररीला देण्यात आली होती. आता हे नेहरू मेमोरियल म्युझियम आणि लायब्ररी हे पंतप्रधान संग्रहालय आणि ग्रंथालय म्हणून ओळखले जाते. पंडित नेहरू यांनी अल्बर्ट आइनस्टाईन, जयप्रकाश नारायण, पद्मजा नायडू, विजय लक्ष्मी पंडित, अरुणा असफ अली, बाबू जगजीवन राम आणि गोविंद वल्लभ पंत यांसारख्या प्रमुख व्यक्तींसोबत केलेल्या पत्रव्यवहाराचा यात समावेश आहे. तर काही संभाषणांवर आधारित आहेत.
पीएमएमएलने या पत्रात पुढे असे लिहिले आहे की, “या दस्तऐवजांचे ‘नेहरू कुटुंबा’साठी वैयक्तिक महत्त्व आहे. आणि याची आम्हाला जाण आहे. परंतु या ऐतिहासिक साहित्याचा, अभ्यासक आणि संशोधकांना खूप फायदा होईल, असा विश्वास पीएमएलला आहे.”
पंतप्रधान संग्रहालयाचे सदस्य रिझवान कादरी यांनी 10 डिसेंबर रोजी याबाबत राहुल गांधींना पत्र लिहिले आहे. या पत्रात कादरी यांनी राहुल गांधींना सोनिया गांधींना दिलेली पत्रे, फोटो कॉपी आणि डिजिटल कॉपी परत करण्याचे आवाहन केले आहे. यापूर्वी संग्रहालयाने सप्टेंबरमध्ये सोनिया गांधी यांना पत्रही लिहिले होते. यासंदर्भात रिजवान कादरी यांनी सांगितले की, सप्टेंबर 2024 मध्ये मी सोनिया गांधींना पत्र लिहून विनंती केली होती की, 2008 मध्ये नेहरू मेमोरिअल म्युझियम आणि लायब्ररीमधून घेतलेली पत्रे संस्थेकडे परत करावीत.