भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल १८ डिसेंबर रोजी चीन दौऱ्यावर जात आहेत. तेथे ते प्रत्यक्ष नियंत्रण रेषा(LAC ) आणि अन्य द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा करतील अशी माहिती समोर अली आहे. चीन दौऱ्यादरम्यान अजित डोवाल चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांची भेट घेऊ शकतात. अजित डोवाल यांचा हा दौरा दोन दिवसांचा असणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अजित डोवाल त्यांच्या चीन दौऱ्यात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तोडगा काढण्यावर आणि दीर्घकाळ चाललेला वाद मिटवण्यावर भर देतील असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे भारत आणि चीन या दोन्ही देशांसाठी ही बैठक विशेष मानली जात आहे. याआधी, डिसेंबर 2019 मध्ये दोन्ही देशांदरम्यान शेवटची प्रतिनिधी स्तरावर चर्चा झाली होती.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जून 2020 मध्ये गलवान व्हॅलीमध्ये झालेल्या संघर्षानंतर दोन्ही देशांमधील ही पहिली चर्चा असेल. गलवान चकमकीनंतर दोन्ही देशांमधील संबंध खूपच बिघडले होते. या विशेष संवादानंतर पुढील कॉर्प्स कमांडर स्तरावरील चर्चेचा मार्गही मोकळा होणार असल्याचे बोलले जात आहे.दोन्ही देशांमधील द्विपक्षीय चर्चेत बफर झोन तयार करण्यावरही चर्चा होऊ शकते. या संवादामुळे दोन्ही देशांमधील स्थिरताही वाढेल.
अलीकडे, 15 डिसेंबर रोजी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर म्हणाले होते की, भारत-चीनने दोन्ही देशांमध्ये समतोल राखला पाहिजे. कारण हा समतोल दोन्ही देशांसाठी फायदेशीर ठरू शकतो, पण तो साधणे सोपे नाही. सध्या दोन्ही देशांना अल्पकालीन उपाययोजनांसह संघर्ष करावा लागला आहे.
अलीकडेच, ऑक्टोबर 2024 मध्ये LAC वर गस्त घालण्याबाबत भारत आणि चीन यांच्यात महत्त्वपूर्ण करार झाला होता . करारानुसार, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेची स्थिती जून 2020 पूर्वीसारखीच असेल. जून 2020 मध्ये गलवान व्हॅलीमध्ये भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये मोठी चकमक झाली होती. त्यानंतर तेथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.