दोन दिवसांपूर्वी राज्यातील महायुती सरकारमधील मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला आहे . यावेळी महायुतीच्या 39 मंत्र्यांनी शपथ घेतली. यात 33 कॅबिनेट मंत्री तर 6 राज्य मंत्र्यांचा समावेश आहे. यात भाजपचे 19 मंत्री, शिवसेनेचे 11 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या 9 मंत्र्यांचा समावेश आहे. महायुतीच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तर काही वरिष्ठ आणि ज्येष्ठ नेत्यांना वगळण्यात आले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात येवला मतदार संघातील आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना वगळण्यात आल्याने त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.पत्रकारांसमोर आपली भूमिका मांडताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आपल्या नावाला विरोध कधीच नव्हता असे सूचक विधान केले आहे.
तसेच प्रश्न हा मंत्री होण्याचा नाही तर मला ज्या पद्धतीप्रमाणे अवहेलना करून डावलले गेले त्याचा हा प्रश्न आहे मी म्हणजे खेळणं समजून माझ्याशी वागत असतील तर ते चुकीचे आहे आणि असं कधी मी होऊ देणार नाही अशी भूमिका छगन भुजबळ यांनी व्यक्त केली आहे.
पत्रकारांशी बोलताना राजकीय परिस्थितीबाबत बोलताना छगन भुजबळ म्हणाले की त्या त्या पक्षप्रमुकाने कोणाला मंत्री करावे हे ठरवायचे असते. माझ्या मंत्रिपदासाठी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तयार होते त्यांनी त्याबाबतची माहिती ही आमच्या पक्षप्रमुखांना दिल्याची माझ्याकडे माहिती आहे त्यामुळे फडणवीस यांचा विरोध होता असे आपल्याला म्हणता येणार नाही असे स्पष्ट करून ते पुढे म्हणाले की असे काय झाले की जेणेकरून मला डावलण्यात आले आणि मंत्रीपदापासून दूर ठेवले याचे उत्तर मी शोधतोच आहे ते मला मिळेल . मंत्रीपदाची मला आस नाही आत्तापर्यंत अनेक मंत्रिपदे आली गेली पण ज्या पद्धतीने अवहेलना झाली ती चुकीची होती. अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे.
मला लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी तातडीने बोलून यांनी सांगितले पण एक महिना झाला तरी माझ्या नावाची घोषणा झाली नाही आणि वेळ कमी असल्यामुळे मी मग यातून बाहेर पडलो मग मला राज्यसभेवर जाण्यासाठी सांगितले त्यावेळेस मी तयारी दाखवली पण पाटील यांचे भाऊ यांना राज्यसभेवर पाठविण्यात आले आणि आता मला विधानसभेच्या निवडणुकीनंतर माझ्या मतदारसंघातील मतदारांचा आणि नागरिकांचा विश्वास तोडून राज्यसभेवर जाण्यासाठी सांगत आहे ही कुठली पद्धत झाली असा प्रश्न उपस्थित करून भुजबळ पुढे म्हणाले की मी दोन एक वर्षानंतर राज्यसभेवरती जाईन पण त्यापूर्वी माझ्या मतदारसंघातील प्रश्न सोडवणे महत्त्वाचे आहे मतदारांनी कार्यकर्त्यांनी जो विश्वास माझ्यावरती टाकला आहे तो सार्थ ठरवून हे माझ्यासाठी आत्ता महत्त्वाचा आहे.
दरम्यान मला कुठल्याही चर्चेसाठी मला अजित पवार किंवा प्रफुल्ल पटेल यांनी कोणीही फोन केलेला नाही असे म्हणत भुजबळांनी राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यपद्धतीवर निशाणा साधला आहे.