नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरु असून आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे तसेच मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे. या भेटीमागील कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. उद्धव ठाकरेंनी फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचीदेखील भेट घेतली आहे.
मात्र उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या भेटीनंतर सर्वांचा भुवया उंचावल्या असल्याचे दिसून येत आहे. नागपुरातील मुख्यमंत्री दालनात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी फडणवीसांची भेट घेतली आहे .बंद दरवाज्याआड दोन्ही नेत्यांमध्ये 6-7 मिनिटे चर्चा झाली.
या भेटीनंतर पत्रकारांना प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे यांनी , महाराष्ट्रात सुसंस्कृत राजकारणाची अपेक्षा असून ही केवळ सदिच्छा भेट होती. असे सांगितले आहे. आम्ही निवडणूक जिंकू शकलो नाही, महायुती निवडणूक जिंकली आहे .त्यामुळे आता महाराष्ट्राच्या हिताची काम होतील अशी अपेक्षा आहे. मात्र हे सरकार कसे आले याबाबत आम्ही जनतेच्या माध्यमातून आवाज उठवणार आहोत. असेही नमूद केले आहे.
नुकताच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचा विजय झाला. त्यानंतर मुख्यमंत्रीपद आणि उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी सोहळ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झाला. या सोहळ्यासाठी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना निमंत्रण देण्यात आले होते . मात्र या दोन्ही नेत्यांनी शपथविधीला उपस्थिती लावली नव्हती.तसेच उद्धव ठाकरे यांनी याबाबत थेट प्रतिक्रिया देणे ही टाळले होते. या सर्व पार्श्वभूमीवर आज झालेली देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरते आहे.