काँग्रेसने स्वतःच्या फायद्यासाठी राज्यघटनेचा (संविधानाचा) गैरवापर केला. काँग्रेसने मुस्लीम तुष्टीकरण केले पण समान नागरी कायदा (यूसीसी) लागू करण्याबाबत काहीच हालचाल केली नाही. मात्र आम्ही देशातील प्रत्येक राज्यात यूसीसी लागू करू असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले आहे . ते काल राज्यसभेत संविधानावरील चर्चेदरम्यान बोलत होते.
यावेळी अमित शाह म्हणाले की, काँग्रेस सरकारच्या काळात संविधानाचा गैरवापर केला. काँग्रेसने कलम 14-15 चे उल्लंघन केले. त्यांनी मुस्लिम पर्सनल-लॉ आणण्यासाठी काम केले. यामुळे देशभरात तुष्टीकरण पाहाया मिलत आहे. मात्र आम्ही उत्तराखंडमध्ये समान नागरिक कायदा लागू केला, आता देशातील प्रत्येक राज्यात लागू करणार असल्याचे शाह यांनी सांगितले. तसेच काँग्रेसवाले मुस्लिम धर्मासाठी स्वतंत्र कायदा आणण्याची भाषा करतात. मला काँग्रेसला विचारायचे आहे की, धर्मनिरपेक्ष राष्ट्रात सर्व धर्मांसाठी कायदा असावा की नाही ? हे लोक 50 टक्क्यांहून जास्त आरक्षण देण्याची भाषा करतात. देशातील 2 राज्यांमध्ये तर त्यांनी घटनाबाह्य पद्धतीने धर्माच्या आधारावर आरक्षण दिले आहे. धर्माच्या आधारावर आरक्षण देता येत नाही. दोन्ही राज्यात काँग्रेसची सत्ता असताना धर्माच्या आधारे आरक्षण दिले जात होते, त्यावर सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. जोपर्यंत भाजपचा एकही सदस्य आहे, तोपर्यंत आम्ही धर्माच्या आधारावर आरक्षण देऊ देणार नाही,असे शाह यांनी ठणकावून सांगितले आहे.
जुने संदर्भ देताना शाह म्हणाले की, राजीव गांधी यांनी मंडल आयोगाच्या विरोधात सर्वात प्रदीर्घ भाषण केले होते. राजीव गांधींचे भाषण लोकसभेच्या रेकॉर्डवरही आहे. .मात्र मोदी सरकारने ओबीसी आयोगाला मान्यता देऊन मागासवर्गीयांचा आदर केला आहे. काँग्रेस पक्ष आरक्षणविरोधी आहे. त्याचे म्हणणे आणि करणे यात फरक आहे. काका साहेब आयोगाचा अहवाल कुठे आहे, कोणी सांगू शकेल का ? या आयोगाचा अहवाल स्वीकारला असता तर 1980 मध्ये मंडल आयोगाच्या अहवालाची गरजच पडली नसती, असेही अमित शाह म्हणाले आहेत.
प्रत्येक व्यक्तीला समानतेने जगण्याचा अधिकार आहे. माणसाची आर्थिक स्थिती ही त्याच्या बुद्धिमत्तेवर आणि मेहनतीवर अवलंबून असते. तब्बल 75 वर्षे गरीबी हटावचा नारा देणाऱ्या काँग्रेसने देशातील लोकांना गरीब ठेवले आहे . मोदी सरकारने 9.6 कोटी गरीब महिलांना उज्ज्वला कनेक्शन देऊन गॅस सिलिंडर दिले, करोडो रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आणि आयुष्मान योजनेत लोकांना मोफत उपचार मिळाले आहेत. देशाच्या 36 राज्यातील 80 कोटी लोकांना रेशन कार्ड आणि मोफत रेशन दिल्याचे शाह यांनी आपल्या भाषणात नमूद केले आहे.