रशियाच्या कुर्स्क भागात सुरू झालेल्या युद्धात युक्रेनच्या लष्कराने उत्तर कोरियाच्या अनेक सैनिकांना ठार केले आहे. अमेरिकेतील एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने हा दावा केला आहे. रशियासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. युक्रेनविरुद्धच्या लढाईत उत्तर कोरियाचे सुमारे 10,000 सैनिक रशियन सैन्याला साथ देत आहेत.
गार्डियन वृत्तपत्राने एका अमेरिकन अधिकाऱ्याच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. युक्रेनमध्ये लढताना शेकडो उत्तर कोरियाचे सैनिक मारले गेल्याचा दावा या बातमीत करण्यात आला आहे. कुर्स्क भागातून युक्रेनियन सैन्याला मागे हटवण्यासाठी रशिया धडपडत आहे. युक्रेनच्या सैन्याने या वर्षाच्या सुरुवातीला हा परिसर ताब्यात घेतला होता. विशेषतः या भागात उत्तर कोरियाचे सैनिक तैनात करण्यात आले आहेत.
ओळख सांगण्यास नकार देणाऱ्या अमेरिकन अधिकाऱ्याने माध्यमांना दिलेल्या निवेदनात उत्तर कोरियाच्या अधिकृत नावासाठी ‘डीपीआरके’ हे संक्षेप वापरले. युक्रेनचे कमांडर-इन-चीफ अलेक्झांडर सिरस्की यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते की, रशिया कुर्स्क भागात उत्तर कोरियाच्या सैन्याचा वापर करत आहे.
फेब्रुवारी 2022 मध्ये मॉस्कोने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर उत्तर कोरिया आणि रशियाने आपले लष्करी संबंध मजबूत केले आहेत. प्योंगयांग आणि मॉस्को यांच्यात जूनमध्ये स्वाक्षरी केलेला ऐतिहासिक संरक्षण करार या महिन्याच्या सुरुवातीला लागू झाला आहे. अण्वस्त्रधारी उत्तर कोरियाचे नेते किम जोंग-उन रशियाकडून प्रगत तंत्रज्ञान आणि त्यांच्या सैन्यासाठी लढाऊ अनुभव घेण्यास उत्सुक आहेत.अशीही माहिती समोर आली आहे.