नागपूरमध्ये चालू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवसाच्या कामकाजाला सुरवात झाली आहे. नागपुरात विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी आंदोलन केलेले दिसून आले. कापूस, सोयाबिन व तूर या शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळाला पाहिजे, या मागणीसाठी महाविकास आघाडीच्या आमदारांनी आज“कापसाच्या झाल्या वाती सोयाबिनची झाली माती”, “शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या सरकारचा धिक्कार असो,”, अशी घोषणाबाजी करत व हातात सोयाबीन, तूरची रोपं, गळ्यात कापसाच्या बोंडाच्या माळा घालून विधिमंडळाच्या पायऱ्यांवर जोरदार आंदोलन केलेले बघायला मिळाले आहे.
बीड-परभणीच्या मुद्द्यावरती आज सुरुवातीलाच विधानसभेत चर्चा होणार आहे. या विषयावरून विरोधक नाना पटोले, नमिता मुंदडा, संदीप क्षीरसागर, नितीन राऊत, सुनिल प्रभू, जितेंद्र आव्हाड, अबू आझमी हे सरकारला धारेवर धरतील असे सांगितले जात आहे. या चर्चेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावर उत्तर देणार असून या कारवाई संदर्भात मुख्यमंत्री यावर मोठी घोषणा करण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे.
तसेच राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेचा आज दुसरा आणि शेवटचा दिवस असणार आहे. तसेच दोन दिवसांच्या गैरहजेरीनंतर आज उपमुख्यमंत्री अजित पवार विधान भवनात उपस्थित आहेत. अजित पवार हे घशाच्या संसर्गामुळे त्रस्त असल्याने दोन दिवस कामकाजास उपस्थित राहू शकले नाहीत अशी माहिती समोर आली आहे.