पुणे: बांगलादेशमधील हिंदू समाजावर होणाऱ्या वाढत्या अत्याचारांच्या निषेधार्थ मंगळवारी पुण्याच्या कोथरूड येथील हुतात्मा राजगुरू चौकात निदर्शने करण्यात आली. या निदर्शनांमध्ये विविध हिंदू संघटनांसह मोठ्या प्रमाणात हिंदू नागरीक सहभागी झाले होते.
आंदोलकांनी बांगलादेशमधील हिंदू आणि इतर अल्पसंख्याकांवरील होणाऱ्या मानवाधिकार उल्लंघनाचा तीव्र निषेध केला. हातात फलक घेऊन आणि घोषणांच्या माध्यमातून त्यांनी हिंदूंवर होणारे हल्ले तातडीने थांबवून आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. तसेच बांगलादेश सरकारने हिंदू आणि इतर अल्पसंख्यकांच्या सुरक्षेची हमी देणे, अशीही मागणी केली.
प्रसिद्ध लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते भरत अमदापुरे यांनी आपल्या भाषणात बांगलादेशी सरकार आणि अधिकारी हिंदूंवर होणाऱ्या हल्ल्यांकडे दुर्लक्ष करत आहेत, असा आरोप केला. “बांग्लादेशात १९७१ मध्ये २२ टक्के हिंदू होते. त्यांचा विविध प्रकारे छळ करून आता तिथे केवळ आठ टक्के हिंदू राहिलेत, आणि त्यांच्यावरही सतत अमानुष हल्ले होतात,” असे ते म्हणाले.
बांगलादेशच्या स्वातंत्र्यानंतर ५३ वर्षे उलटली असून, आजतागायत हिंदू समाजावर केलेल्या अत्याचारांच्या विरोधात कोणत्याही सरकारने कारवाई केली नाही. यामुळे अशा गुन्ह्यांना पूर्णपणे अभय मिळाल्याचा वातावरण निर्माण झालं आहे, ज्यामुळे गुन्हेगारांना पुढे जाऊन त्यांचे कृत्य करत राहण्यास प्रोत्साहन मिळाले आहे, असे अमदापुरे म्हणाले.
भारतीय जनता पार्टीचे डॉ संदीप बुटाला यांचेही ह्यावेळी भाषण झाले. त्यांनी या हिंसाचाराला “हिंदू नरसंहार” म्हणून संबोधले आणि बांगलादेश सरकारला त्याच्या अल्पसंख्यकांची सुरक्षा सुनिश्चित करण्याची विनंती केली. “आम्ही बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांचा तीव्र निषेध करतो आणि या उल्लंघनांचा त्वरित समापन होण्याची मागणी करतो,” असे ते म्हणाले.
५ ऑगस्टला शेख हसीना यांच्या अवामी लीग सरकारच्या पतनानंतर बांगलादेशमध्ये हिंदूंवर हल्ले वाढले, ज्यात अनेकांची हत्या केली, बलात्कार केले आणि इतर मानवी हक्कांचे उल्लंघन केले. संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेने ह्यात हस्तक्षेप करावा अशी मागणी येथे करण्यात आली.
हिंदू धार्मिक नेते चिन्मय कृष्ण दास यांच्या अटकेने बांगलादेशी आंदोलक अधिक आक्रमक झाले. श्री दास यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आणि त्यांना न्यायालयाने जामीन नाकारला, त्यानंतर हिंदू नागरिक आणि इस्कॉन समुदायावर हल्ल्यांची मालिका सुरू झाली. यामध्ये राजधानी ढाका आणि चट्टोग्राम यांसारख्या ठिकाणी हिंसाचार वाढला.
हिंदू लोकांच्या घऱांवर, मंदीरांवर आणि व्यावसायिक संस्थांवर जवळ-जवळ ५० जिल्ह्यांमध्ये १,०६८ हल्ले झाले असल्याचे वृत्त अलीकडेच प्रसिद्ध झाले आहे.
या वेळी, पवित्रम फाउंडेशनचे तुषार कुलकर्णी, राजे शिवराय प्रतिष्ठानचे महेश पवळे, हिंदू एकता चे सुहास परळीकर, राष्ट्र सेविका समितीच्या सौ शलाका गोटखिंडीकर, विश्व हिंदू परिषदेचे शुभम मुळीक आणि रामराज्य प्रतिष्ठानचे आशिष कांटे यांची भाषणे झाली. इस्कॉन संस्थे तर्फे श्री रसाश्रय प्रभू आणि केदार घाटे यांचे सुश्राव्य कीर्तन झाले. कार्यक्रमेचे प्रास्ताविक अमोल जोशी यांनी केले तर सूत्र संचालन चैतन्य बोडके यांनी केला.
या कार्यक्रमाला विविध न्याती संघटनांचे प्रमुख, माजी नगरसेवक तसेच काही प्रतिष्ठित नागरिक या सम साधारणतः बाराशे जण उपस्थित होते