आसाम पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने (एसटीएफ) केरळ आणि पश्चिम बंगाल पोलिसांच्या मदतीने आठ जिहादींना (कट्टरपंथी) अटक केली आहे. यामध्ये एक बांगलादेशी नागरिकही आहे. हे मॉड्यूल देशात हिंसक हल्ले घडवून हिंदू नेत्यांना लक्ष्य करण्याच्या तयारीत होते, असा आरोप आहे. ऑपरेशन ‘प्रगती’ अंतर्गत, पोलीस देशभरातील इतर मॉड्यूल्सचा शोध घेत आहेत.
आसाम पोलिस मुख्यालयात आज आयोजित पत्रकार परिषदेत आसाम पोलिसांचे विशेष डीजीपी हरमीत सिंग म्हणाले की, ‘प्रगती’ या देशव्यापी ऑपरेशन अंतर्गत केरळ आणि पश्चिम बंगाल पोलिसांच्या मदतीने दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश करण्यात आला आहे. पोलिसांनी संयुक्त कारवाईत आठ जिहादींना अटक केली आहे. अब्दुल करीम,, अब्बास अली, एनामुल हक, हमीदुल इस्लाम, मिनरूल एसके, शुरू इस्लाम मंडल, हम्मद साद रादी उर्फ शाब शेख अशी या जिहादींची नावे आहेत.. त्यांच्याकडून बांगलादेशी कागदपत्रे, मूलगामी साहित्य आणि डिजिटल उपकरणे जप्त करण्यात आली आहेत.
हम्मद साद रादी उर्फ शाब शेख (वय 32, रा. बांगलादेशातील राजशाही) हा गेल्या नोव्हेंबरमध्ये भारतात आला होता. हे आरोपी आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये स्लीपर सेल तयार करण्यात आणि जिहादी विचारसरणीचा प्रसार करण्यात गुंतले होते.
या जिहादींनी परिसरात अनेक सभा घेऊन हिंदू संघटना आणि प्रमुख धार्मिक नेत्यांवर हल्ला करण्याची योजना आखली होती. त्याचा उद्देश परिसरात जातीय तेढ पसरवणे हा होता.
अटक करण्यात आलेल्या नूर इस्लाम मंडलला यापूर्वीही एका प्रकरणात अटक करण्यात आली होती आणि तो जामिनावर बाहेर होता,तो इतर आरोपींसोबत तरुणांना दहशतवादी संघटनांशी जोडण्याचा प्रयत्न करत होता. असे सिंग यांनी सांगितले आहे. आसाम पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी या तपासावर लक्ष ठेवून आहेत.