बीडमधील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या कारवाईचे संकेत दिले आहेत. या गुन्ह्याचा सर्व संबंध तपासला जात आहे. गुन्हेगार कोणीही असो त्याची हयगय न करता बीडमधील संघटित गुन्हेगारी मोडून काढू अशी मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात ते बोलत होते.
बीड जिल्ह्यामध्ये मस्साजोगमध्ये जे प्रकरण झाले ते अत्यंत गंभीर आहे.संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाली एवढ्यापुरतेच ते मर्यादीत नाही तर बीडमध्ये ज्याप्रकारे गुंडगिरी पाहायला मिळतेय ती संपवावी लागणार आहे. यासाठी कारवाई होईल याबाबत मी या सभागृहांमध्ये तुम्हाला आश्वस्त करतो . तसेच बीड जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या जे कोणी असतील त्यांची पाळेमुळे आम्ही खणून काढू आणि ज्या सर्वांवर गुन्हे आहेत, त्यावर 302 तर लागेलच पण त्यांच्यासोबत काम करायला जेवढे लोक आहेत. वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये जे सर्व एकत्रितपणे मकोका गुन्ह्यासाठी पात्र होतात, त्यांच्यावर मकोका लावण्यात येईल, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.
बीड हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याचा संबंध कुणासोबत आहे, याचा विचार न करता कारवाई केली जाईल. त्याचे फोटो सर्वांसोबत आहेत. आमच्यासोबत व पवार साहेबांसोबतही आहेत. मात्र पोलीस प्रशासनाची ही जबाबदारी आहे, स्वर्गीय संतोष देशमुख यांना न्याय मिळवून दिला जाईल, अशी ग्वाही यावेळी देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे.
त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या हत्या प्रकरणी बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस एसपींची तात्काळ बदली करणार असल्याची घोषणा सभागृहात केली आहे .तसेच आयजी लेव्हल अधिकारी अंतर्गत या प्रकरणाची एसआयटी चौकशी केली जाईल. तसेच या प्रकरणाची न्यायालयीन चौकशीही केली जाईल. तीन ते सहा महिन्यात याप्रकरणाची चौकशी पूर्ण होईल असे आश्वासन फडणवीस यांनी दिले आहे.