पेडका-अरनपूर माओवादी हल्ल्यातील आरोपी बांद्रा तातीला एनआयएच्या पथकाने अटक केली आहे. या हल्ल्यामध्ये 10 सैनिक आणि 1 नागरिक यांना आपले प्राण गमवावे लागले होते. छत्तीसगडमध्ये गेले काही दिवस नक्षलविरोधी मोहीम सुरूच आहे. आता या मालिकेत आता एनआयएच्या टीमला येथे मोठे यश मिळाले आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने सीआरपीएफ आणि छत्तीसगड पोलिसांच्या मदतीने गुरुवारी ही कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. पोलिस अधीक्षक जितेंद्र यादव यांनी ही माहिती दिली आहे.
एनआयएच्या प्रसिद्धीनुसार, बांद्रा ताती इतर नक्षलवाद्यांसह दहशतवादी हल्ल्याच्या कटात थेट सहभागी होता. तपासात असेही समोर आले आहे की, आयईडीची वाहतूक करण्याव्यतिरिक्त, ताती हा प्राणघातक हल्ल्यांमध्येही सहाय्यक भूमिका बजावत होता. तपासादरम्यान अनेक महत्त्वाचे धागेदोरे समोर आल्यामुळे तातीला पकडण्यात यश आले आहे. या अटकेमुळे सुरक्षा दलांचे मनोबलही बळकट होणार असून नक्षलवादाविरोधात सुरू असलेली कारवाई आणखी तीव्र होणार आहे.
23 एप्रिल 2023 रोजी तातीने अरणपूरमधील पेडका चौकाजवळ हल्ला केला होता. यामध्ये दहा जवानांना प्राण गमवावे लागले होते. या घटनेनंतर छत्तीसगड पोलिसांनी २६ आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते, त्यानंतर फेब्रुवारी २०२४ मध्ये तपास एनआयएकडे सोपवण्यात आला होता.
एनआयएने गुरुवारी सुकमा आणि विजापूरमधील पाच ठिकाणी छापे टाकले आहेत . यावेळी स्मार्ट फोन, सिमकार्ड व इतर आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत .