फडणवीस सरकारच्या नागपूरमधल्या हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस, हे अधिवेशन अनेक कारणांनी गाजले. अनेक घटनांवरती गेल्या ६ दिवसात विधानभवनात चर्चा झाल्या, मात्र, विदर्भ करारानुसार सहा आठवड्यांचे अपेक्षित असलेले हिवाळी अधिवेशन आता फक्त एक आठवड्यात पुरते मर्यादित झाले आहे. गेले अनेक वर्ष हिवाळी अधिवेशनाचा कालावधी कमी कमी होत दोन ते तीन आठवड्यापर्यंत मर्यादित करण्यात आला होता. यंदा मात्र नुकतेच सत्तेवर आलेल्या महायुती सरकारच्या काळात अवघ्या एक आठवडाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात झाल्याने विदर्भातील विविध मुद्द्यांना अधिवेशनात अपेक्षित वाव मिळू शकला नाही असे मतही काहींनी व्यक्त केले आहे. तसेच यंदा प्रश्नोत्तरांचा तास व लक्षवेधी सूचनाची संधी नसल्यामुळे अनेक आमदारांना खास करून नवीन आमदारांना या अधिवेशनात बोलण्याची संधीही मिळाली नाही असे दिसून आले.
या अधिवेशनामध्ये गाजलेले दोन मुद्दे म्हणजे बीड आणि परभणीमध्ये झालेल्या घटना ,कल्याणमध्ये मराठी कुटुंबाला परप्रांतीयांकडून झालेली मारहाण आणि या सर्वांबाबत फडणवीस सरकारकडून देण्याचे आलेले निवेदन आणि त्याबाबत करण्यात आलेली कारवाई .
अधिवेशनाच्या आजच्या शेवटच्या दिवशी मोठ्या घोषणेची शक्यता असल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची आज भेट घेतली असून खातेवाटपाची घोषणा आज होऊ शकते असे सांगितले जात आहे. तर दुसरीकडे मंत्रीपद न मिळाल्याने महायुतीच्या अनेक आमदारांमध्ये नाराजी असल्याची एकच चर्चा असताना ऐन अधिवेशनात खातेवाटप झाल्यासही आणखी नाराजी वाढू शकते, त्यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सावध पवित्रा घेत असल्याचे बोलले जात आहे.
महायुती सरकारमध्ये खातेवाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. यानुसार भाजपकडे महसूल, सार्वजनिक बांधकाम, पर्यटन आणि ऊर्जा ही चार खाती असतील . तर शिवसेनेकडे नगरविकास आणि गृहनिर्माण खाते असेल. तसेच राष्ट्रवादीकडे अर्थ खाते आणि उत्पादन शुल्क खाते देण्यात येणार आहे. अशी माहिती समोर येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून महायुतीत तिढा निर्माण झालेले गृहखाते अखेर भाजपकडे राहणार असल्याची माहिती समोर अली आहे. शिवसेना आणि भाजपमध्ये गृहखात्यावरुन मोठा वाद झाला होता. मात्र अखेर भाजप स्वत:कडे गृहखाते ठेवण्यास यशस्वी झाली आहे. तसेच शिवसेनेकडे नगरविकास खाते देण्यात येणार आहे.