देशाच्या स्वावलंबी होण्याच्या प्रवासात आज एक महत्वाचा दुवा जोडला गेला आहे कारण एकाच वेळी दोन युद्धनौका भारतीय नौदलाला सुपूर्द करण्यात आल्या आहेत ‘स्टेल्थ फ्रिगेट- INS निलगिरी (प्रोजेक्ट 17A)’ आणि ‘गाइडेड मिसाइल डिस्ट्रॉयर- INS सूरत (प्रोजेक्ट 15B)’ अशी त्यांची नावे आहेत.ही जहाजे भारतीय नौदलाच्या वॉरशिप डिझाइन ब्युरोने स्वदेशी पद्धतीने डिझाइन केली आहेत आणि ती माझगाव डॉक लिमिटेड (एमडीएल) ने बांधली आहेत. ताफ्यात एकाच वेळी दोन अत्याधुनिक युद्धनौकांचा समावेश केल्याने भारतीय नौदलाची ऑपरेशनल आणि लढाऊ क्षमता वाढणार आहे.
नौदलाला मिळालेले ‘सूरत’ हे जहाज प्रोजेक्ट १५बी स्टेल्थ गाइडेड मिसाईल डिस्ट्रॉयर्सपैकी चौथे आणि शेवटचे आहे. गेल्या तीन वर्षांत, याच प्रकल्पातील तीन जहाजे, विशाखापट्टणम, मोरमुगाव आणि इम्फाल, नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट करण्यात आले आहेत. सूरत ह्या जहाजाचे काम २०२१ मध्ये सुरू करण्यात आले. एकूण ७,४०० टन वजन आणि १६४ मीटर लांबी असलेले मार्गदर्शित क्षेपणास्त्र विनाशक असल्याने, आयएनएस सूरत हे एक असे शक्तिशाली जहाज आहे की , जे अत्याधुनिक शस्त्रे आणि सेन्सर्सने सुसज्ज आहे ज्यात जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे, जहाजविरोधी क्षेपणास्त्रे आणि टॉर्पेडो यांचा समावेश आहे. समुद्री चाचण्यांदरम्यान त्याने ३० नॉट्स (५६ किमी/तास) पेक्षा जास्त वेग गाठला आहे. ही भारतीय नौदलाची पहिली स्वदेशी विकसित एआय सक्षम युद्धनौका आहे, जी तिची कार्यक्षमता अनेक पटीने वाढवू शकते.
तर नौदलाला सुपूर्द केलेली निलगिरी हे प्रकल्प १७ए स्टेल्थचे पहिले जहाज आहे. या योजनेतील सात जहाजे एमडीएल, मुंबई आणि जीआरएसई, कोलकाता येथे बांधली जात आहेत. “इंटीग्रेटेड कन्स्ट्रक्शन” तंत्रज्ञानाचा वापर करून बांधलेले हे जहाज, ‘ब्लू वॉटर’ वातावरणात कार्य करू शकते आणि भारताच्या समुद्री सीमांचे, ज्ञात असलेल्या तसेच अप्रत्यक्ष धोक्यांपासून संरक्षण करु शकते.ही जहाजे डिझेल किंवा गॅसद्वारे चालविली जातात. या जहाजांमध्ये अत्याधुनिक एकात्मिक प्लॅटफॉर्म व्यवस्थापन प्रणाली देखील आहे. या जहाजांमध्ये सुपरसॉनिक पृष्ठभागावरून पृष्ठभागावर मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली, मध्यम पल्ल्याच्या पृष्ठभागावरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली, ७६ मिमी अपग्रेडेड तोफा आणि जलद गोळीबार करणारी जवळची शस्त्र प्रणाली बसवण्यात आली आहे.
In a historic milestone for the country’s #Aatmanirbharata journey, two warships, a Frigate (Nilgiri) and a Destroyer (Surat) were delivered to the #IndianNavy on #20Dec 24.
The ships have been designed & constructed indigenously by the Warship Design Bureau of the Navy and… pic.twitter.com/UaaUytp7fF
— SpokespersonNavy (@indiannavy) December 20, 2024
२०४७ पर्यंत नौदलाला स्वावलंबी बनवण्याचे उद्दिष्ट लक्षात घेऊन, या दोन्ही युद्धनौकांमध्ये ७५ टक्के स्वदेशी सामग्री बसवण्यात आली आहे. या प्रकल्पांमुळे देशात स्वावलंबीता, आर्थिक विकास आणि रोजगाराला चालना मिळाली आहे. या युद्धनौकांमध्ये बसवण्यात आलेली प्रमुख शस्त्रे आणि सेन्सर BAPL, L&T, MTPF, BEL, BHEL, महिंद्रा इत्यादी स्वदेशी कंपन्यांकडून खरेदी करण्यात आले आहेत. या वर्गातील उर्वरित सहा जहाजे MDL, मुंबई आणि GRSE, कोलकाता येथे बांधकामाच्या विविध टप्प्यात आहेत. जी जहाजे २०२५ आणि २०२६ मध्ये भारतीय नौदलाला सुपूर्द केली जाण्याची अपेक्षा आहे.
भारतीय नौदलामध्ये झालेला, ‘सूरत’ आणि ‘निलगिरी’ ह्या युद्धनौकांचा समावेश, ही एक भारताच्या सागरी सामर्थ्यातील एक महत्त्वपूर्ण झेप ठरली आहे.