उत्तर प्रदेशातील पिलीभीतमध्ये तीन खलिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. या सर्वांवर पंजाबमधील गुरुदासपूर येथील पोलीस चौकीवर हल्ला केल्याचा आरोप आहे. हे तिन्ही दहशतवादी पिलीभीतच्या पुरनपूर भागात लपून बसले होते. पंजाब आणि उत्तर प्रदेश पोलिसांच्या संयुक्त पथकाने केलेल्या चकमकीत तिघेही मारले गेले असून त्यांच्याकडून पिस्तूल आणि इतर शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत. या चकमकीत दोन पोलीस कर्मचारीही जखमी झाले आहेत.
पंजाब पोलिसांच्या एका पथकाने पिलीभीत पोलिसांना जिल्ह्यातील पुरनपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका भागात तीन आरोपींच्या उपस्थितीची माहिती दिली होती त्यानंतर कारवाई सुरू करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन दहशतवादी पिलीभीत जिल्ह्यातील पुरनपूर भागात लपून बसले होते. गुरविंदर सिंग, वीरेंद्र सिंग उर्फ रवी, जसनप्रीत सिंग उर्फ प्रताप सिंग अशी त्यांची नावे आहेत. त्यांचे वय 18 ते 25 वर्षे आहे. तिघेही पंजाबचे रहिवासी आहेत.
या चकमकीत शाहनवाज आणि सुमित राठी हे दोन पोलीस जखमी झाले असून दोघांना रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
डीजीपी पंजाब पोलिसांनी एक्स वर पोस्ट करत लिहिले आहे आहे की,”पाक-प्रायोजित खलिस्तान जिंदाबाद फोर्स (KZF) दहशतवादी मॉड्यूलच्या विरोधात एक मोठे यश मिळवताना, यूपी पोलिस आणि पंजाब पोलिसांच्या संयुक्त ऑपरेशनमध्ये पोलिस दलावर गोळीबार करणाऱ्या तीन मॉड्यूल सदस्यांसह चकमक झाली. हे दहशतवादी मॉड्यूलमध्ये सामील होते. पीएस पुरनपूरच्या हद्दीत ही चकमक झाली आहे. पीलीभीत आणि पंजाबच्या संयुक्त पोलिस दलाने या खलिस्तानी कमांडो फोर्सच्या तीन दहशतवाद्यांना मारण्यात यश मिळवले आहे.