पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे 71,000 हून अधिक नवनियुक्त नियुक्ती पत्रांचे वाटप केले. आपल्या भाषणात पंतप्रधान मोदींनी नवनियुक्त तरुणांचे अभिनंदन केले. आणि उपस्थितांना संबोधित करताना म्हणाले की,
काल रात्री उशिरा आपण कुवेतहून परतलो आणि तिथे भारतातील तरुण आणि व्यावसायिकांशी खूप चर्चा केली. आता येथे आल्यानंतर देशातील तरुणांसोबत पहिला कार्यक्रम आयोजित केला जात आहे. हा चांगला योगायोग असल्याचे त्यांनी नमूद केले. पुढे ते म्हणाले की, रोजगार मेळावे तरुणांना सक्षम बनवत आहेत आणि त्यांच्यातील क्षमता ओळखत आहेत,आज देशातील हजारो तरुणांच्या आयुष्याची नवी सुरुवात होत आहे. त्यांनी बघितलेली स्वप्ने पूर्ण होत आहेत. पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत की, २०२४ हे वर्ष तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला नवीन आनंद देणारे ठरेल.
रोजगार निर्मितीला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या पंतप्रधानांच्या वचनबद्धतेच्या पूर्ततेसाठी रोजगार मेळावा हे महत्त्वाचे पाऊल आहे. जे तरुणांना राष्ट्र उभारणी आणि आत्म-सक्षमीकरणात सहभागासाठी अर्थपूर्ण संधी प्रदान करते. देशभरातील ४५ ठिकाणी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. केंद्र सरकारच्या विविध मंत्रालये आणि विभागांसाठी भरती होत आहे. देशभरातून निवडलेले नवीन कर्मचारी गृह मंत्रालय, पोस्ट विभाग, उच्च शिक्षण विभाग, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, वित्तीय सेवा विभाग यासह विविध मंत्रालये आणि विभागांमध्ये रुजू होणार आहेत.