बांगलादेशमध्ये एका स्वातंत्र्यसैनिक (मुक्ती योद्धा) सोबत एक लज्जास्पद कृत्य घडले आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये स्वातंत्र्यसैनिकाला चपलांचा हार घालून त्यांच्या कुमिल्ला गावाभोवती नेण्यात आले होते. युनूस सरकारच्या काळात घडलेल्या या घटनेने बांगलादेशच्या सांस्कृतिक आणि सामाजिक स्थितीबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
बांगलादेशात हिंदूंवर गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने अत्याचार होत आहेत. आधी बांगलादेशी चलनांवरून शेख मुजिबुर रहमान यांचा फोटो हटवण्याचा निर्णय घेत युनुस सरकारने बांगलादेशच्या राष्ट्रपित्याचा अपमान केला होता. त्यानंतर आता कट्टरपंथीयांनी आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनाही लक्ष्य केल्याचे निदर्शनास आले आहे. १९७१ च्या युद्धातील स्वातंत्र्यसैनिक अब्दुल हई कानू यांच्या गळ्यात चपलांचा हार घालून त्यांना अपमानित केल्याचे एका व्हिडिओद्वारे समोर आले आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये कुमिल्लाच्या चौदाहग्राममधील लुडियारा गावातील रहिवासी अब्दुल हई कानू यांना चपलांचा हार घातलेला दिसत आहे. ते त्यांच्या घराजवळ हात जोडून उभे आहेत. तर त्यांच्यासमोर मोठ्या संख्येने लोक उपस्थित आहेत. जमाव त्याला माफी मागून गाव सोडण्याची मागणी करत आहे. स्वातंत्र्यसैनिक त्यांना विनवणी करताना दिसत आहेत की त्यांना गाव सोडण्यास भाग पाडू नका.
संबंधित व्हिडिओ शेअर करत अवामी लीगने म्हटंले आहे की, ‘स्वातंत्र्य संग्रामात सेवा बजावलेल्या अभिमानी स्वातंत्र्यसैनिक अब्दुल हई कानू यांचा चपलांचा हार घालून अपमान करण्यात आला आहे. हे निंदनीय कृत्य केवळ एखाद्या व्यक्तीवर हल्ला नाही तर आपल्या देशाच्या स्वातंत्र्याच्या मूल्यांवर आणि आपल्या स्वातंत्र्ययुद्धातील वीरांच्या सन्मानावर हल्ला आहे. आपल्या युद्धवीरांविरुद्धच्या अशा घृणास्पद कारवाया सहन केल्या जाऊ शकत नाहीत. बांगलादेशच्या प्रतिष्ठेवर आणि इतिहासावर हा थेट हल्ला आहे आणि सगळ्यांनी त्याविरोधात उभे राहिले पाहिजे.
या घटनेनंतर सोशल मीडियावर खळबळ उडाली असून सर्वत्र निषेध होत आहे,स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी तपास सुरू करण्यात आला आहे, मात्र अब्दुल हई कानू यांनी कोणतीही तक्रार दाखल न केल्याने तपासात अडथळे येत आहेत. या घटनेत सहभागी असलेले लोक स्थानिक असल्याचे दिसत नसून त्यांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.