अमेरिकन अध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यापासून डोनाल्ड ट्रम्प सातत्याने चर्चेत आहेत.अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेण्यापूर्वीच त्यांनी आपल्या मंत्रिमंडळातील सदस्यांचीही निवड केली आहे.ट्रम्प यांच्या या विजयात जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे मस्क यांचाही त्यांच्या मंत्रिमंडळात समावेश असणार असल्याचे बोलले जात आहे.असे झाल्यास, अमेरिकेतील नव्या सरकारची खरी ताकद इलॉन मस्क यांच्या हातात असेल, असे म्हटले जात आहे.या चर्चांवर आता थेट डोनाल्ड ट्रम्प यांनीच उत्तर दिले आहे.
डेमोक्रॅटिक पक्षाकडून सातत्याने ‘राष्ट्रपती मस्क’ असे म्हणत ट्रम्प यांच्यावर निशाणा साधला जात आहे. तसेच, ट्रम्प पुढे जाऊन राष्ट्राध्यक्षपद मस्क यांच्याकडे सोपवतील अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.या टीकेला उत्तर देताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले आहेत की , ‘मस्क हे अमेरिकेचे अध्यक्ष होऊ शकत नाही. असे पुढेही घडणार नाही. तुम्हाला यामागचे कारण माहित आहे का? कारण, त्यांचा जन्म अमेरिकेत झालेला नाही.’ पुढे बोलताना ट्रम्प म्हणाले की, “मला स्मार्ट लोक आवडतात. इलॉन मस्क यांनी उत्कृष्ट काम केले आहे. मला अशा स्मार्ट आणि विश्वासार्ह लोकांची आवश्यकता आहे. मात्र, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होण्यासाठी या देशात जन्म होणे आवश्यक आहे.”
अमेरिकेच्या संविधानानुसार, केवळ त्या देशात जन्मलेली व्यक्तीच राष्ट्रपती होऊ शकते. इलॉन मस्क यांचा जन्म दक्षिण आफ्रिकेत झाला आहे. त्यामुळे ते जगातील महासत्तेचे कधीच राष्ट्रपती होऊ शकणार नाही. ट्रम्प यांनी मस्क हे राष्ट्रपती होऊ शकणार नाही असे स्पष्ट करतानाच निवडणुकीच्या कॅम्पेनमध्ये मस्क हे महत्त्वाचे होते. असे म्हणत त्यांच्या कामगिरीचे कौतुक देखील केले आहे .