‘एक देश-एक निवडणूक’ साठीच्या संयुक्त संसदीय समितीची (जेपीसी) पहिली बैठक ८ जानेवारीला होणार आहे. जेपीसीचे अध्यक्ष पी.पी. चौधरी यांनी ही बैठक बोलावली आहे. या बैठकीत लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याच्या प्रस्तावावर चर्चा होणार आहे.
संसदीय सूत्रांनी सोमवारी सांगितले की, या बैठकीत अधिकारी दोन महत्त्वाच्या विधेयकांची माहिती देतील – संविधान (१२९ वी दुरुस्ती) विधेयक आणि केंद्रशासित प्रदेश (कायदा) दुरुस्ती विधेयक. लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्यासाठी आवश्यक बदल करणे हा या विधेयकांचा उद्देश आहे.
विशेष म्हणजे ही विधेयके गेल्या आठवड्यात लोकसभेत मांडण्यात आली होती. यानंतर हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी त्यांना संसदीय समितीकडे पाठवण्यात आले आहे.
यासाठी संयुक्त संसदीय समिती (JPC) स्थापन करण्यात आली. यापूर्वी समितीची सदस्यसंख्या 31 होती मात्र अनेक राजकीय पक्षांनी समितीत सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केल्यावर त्यांची संख्या 39 करण्यात आली. भाजप खासदार पी. पी. चौधरी हे या समितीचे अध्यक्ष आहेत तर माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, पुरुषोत्तम रुपाला, मनीष तिवारी आणि प्रियांका गांधी, बन्सुरी स्वराज आणि संबित पात्रा यांसारख्या नवीन खासदारांचाही समितीच्या सदस्यांमध्ये समावेश आहे. . लोकसभेचे 27 सदस्य आणि राज्यसभेचे 12 सदस्य मिळून समितीमध्ये एकूण 39 सदस्य आहेत.
विरोधी पक्षांनी या विधेयकाला विरोध केला असून, हे संविधानाच्या संघीय रचनेवर हल्ला असल्याचे म्हटले होते आणि ते मागे घेण्याची मागणी केली होती. काँग्रेस पक्षाने याला लोकशाहीच्या मूळ स्वरूपाच्या विरोधात म्हटले आहे. मात्र केंद्रसरकारचा असा विश्वास आहे की ‘वन नेशन, वन इलेक्शन’ हे निवडणूक सुधारणांच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे, ज्यामुळे वेळ आणि संसाधनांची बचत होईल. तथापि, यावर व्यापक एकमत होण्यासाठी एक समिती अर्थात जेपीसीची स्थापन करण्यात आली आहे, ज्यामध्ये विविध पक्षांच्या विचारांचा समावेश असेल.
हे विधेयक घटनादुरुस्तीशी संबंधित आहे, त्यामुळे ते मंजूर करण्यासाठी संसदेत दोन तृतीयांश बहुमत आवश्यक आहे. सरकारने या विधेयकाच्या प्रती खासदारांना वितरित केल्या आहेत जेणेकरून त्यांना त्याचा अभ्यास करता येईल. समितीचा अहवाल आणि संसदेत चर्चा झाल्यानंतरच या विधेयकाचे भवितव्य ठरवले जाईल. सरकार आणि विरोधकांमध्ये या मुद्द्यावर काय एकमत होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.