गुजरातमधील भरूच जिल्ह्यातील झघडिया तालुक्यातल्या औद्योगिक परिसरात बलात्कार झालेल्या १० वर्षीय ‘निर्भया’चा आठवडाभर मृत्यूशी लढा दिल्यानंतर काल संध्याकाळी ६.५५ वाजता मृत्यू झाला. तिला अंतर्गत भागात झालेल्या जखमांनी गंभीर स्वरूप धारण केले होते.
वडोदरा येथील सर सयाजीराव जनरल हॉस्पिटल (SSGH) चे निवासी वैद्यकीय अधिकारी (RMO) डॉ. हितेंद्र चौहान यांनी सांगितले की, मुलीला दुपारी 2 वाजता हृदयविकाराचा झटका आला. यानंतर तिची प्रकृती बिघडली. उपचारानंतर तिची प्रकृती स्थिर झाली होती मात्र सायंकाळी ५ नंतर तिला पुन्हा हृदयविकाराचा झटका आला. तत्काळ उपचार सुरू करण्यात आले मात्र ह्या दुर्दैवी मुलीला वाचवण्यात डॉक्टरांना अपयश आले. गंभीर अंतर्गत जखमांमुळे संसर्ग पसरल्याने मुलीची लवकर प्रकृती खालावत गेल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे तिच्या अवयवांनी काम करणे बंद केले आणि तिला हृदयविकाराचा झटका आला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,पॅनल आणि फॉरेन्सिक पोस्टमॉर्टमनंतर पीडितेचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला जाणार आहे.
झारखंडच्या मंत्री दीपिका सिंह यांनी सांगितले की, आम्हाला मुलीला झारखंडमध्ये आणायचे आहे कारण ते तिचे गाव आहे, परंतु आम्ही कुटुंबाच्या इच्छेनुसार करू. अशा परिस्थितीत येथील अधिकाऱ्यांनी गुजरात सरकारच्या स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असून आम्ही कुटुंबाच्या संपर्कात आहोत.असे सांगितले आहे.
भरूच जिल्ह्यातील झगडिया भागात १६ डिसेंबर रोजी ही घटना घडली होती. मुलीचे आई-वडील काही कामानिमित्त घराबाहेर गेले होते. दरम्यान, मुलगी एकटी दिसल्यानंतर आरोपी विजय पासवान याने तिचे अपहरण केले आणि तिला झुडपात नेले. त्याने तिच्यावर बलात्कार केला आणि ती रक्तबंबाळ झाल्यावर घटनास्थळावरून पळून गेला. मुलीचा आरडाओरडा ऐकून तिच्या आईने तिला शोधून काढले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
पोलिसांनी सांगितले की, मुलीचे वडील आणि आरोपी एकाच कारखान्यात काम करत असल्याने एकमेकांना ओळखतात. पासवान विवाहित असून त्यांना दोन मुले आहेत. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून (पोक्सो) कायद्यान्वये गुन्हे दाखल केले आहेत