कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल या सरकारी रुग्णालयात निवासी महिला डॉक्टरचा बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केल्याची घटना ऑगस्ट २०२४ मध्ये घडली होती. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरून गेला होता. या घटनेचे पडसाद देशभरात उमटलेले दिसले होते. कोलकाता उच्च न्यायालयाने या प्रकरणाचा सीबीआयकडे तपास सोपवल्यालाही आता ४ महिने उलटून गेले आहेत. आणि अजूनही या प्रकरणामध्ये धक्कादायक खुलासे समोर येताना दिसत आहेत.
आरजी कार मेडिकल कॉलेजच्या सेमिनार हॉलमध्ये महिला डॉक्टर मृतावस्थेत आढळल्याप्रकरणी केंद्रीय न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेच्या (सीएफएसएल) अहवालात नुकताच धक्कादायक खुलासा समोर आला आहे. सेमिनार हॉलमध्ये किंवा पीडितेचा मृतदेह सापडलेल्या लाकडी पलंगावर पिडीतेकडून करण्यात आलेल्या प्रतिकाराची कोणतीही चिन्हे आढळली नाहीत, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
यानंतर या प्रकरणात, पीडितेची अन्यत्र हत्या करून सेमिनार हॉलमध्ये आणण्यात आली असावी, असे प्रश्न आधीच उपस्थित केले जात होते. ज्याला सीएफएसएलच्या अहवालाने या शंकांना आणखी बळ दिले आहे. 9 ऑगस्ट रोजी आरजी कार मेडिकल कॉलेजच्या आपत्कालीन विभागाच्या चौथ्या मजल्यावर असलेल्या सेमिनार हॉलमधून या महिला डॉक्टरचा मृतदेह सापडला होता.
कोलकाता उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआयने या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. सीबीआयने 13 ऑगस्ट रोजी सीएफएसएलची मदत घेतली, त्यानंतर 14 ऑगस्ट रोजी फॉरेन्सिक तज्ञांनी गुन्ह्याच्या ठिकाणाची पाहणी केली. अहवालानुसार, सेमिनार हॉलच्या लाकडी पलंगाच्या व्यतिरिक्त कुठेही खुणा आढळल्या नाहीत. फक्त मृतदेहाजवळ फाटलेले कपडे सापडले आहेत.
CFSL अहवालात असेही म्हटले आहे की चौथ्या मजल्यावरील सेमिनार हॉलमध्ये जाण्यासाठी नर्सिंग स्टेशनमधून जावे लागते, जे 24 तास खुले असते. असे असतानाही कोणालाही संशयास्पद हालचाली दिसल्या नाहीत. सेमिनार हॉलमध्ये पाच दरवाजे आहेत, परंतु त्यापैकी एकच दरवाजा वापरण्यात आला आहे. एवढी सुरक्षा असतानाही एखादी व्यक्ती तिथे कशी पोहोचली हा संशयाचा विषय असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.
घटनास्थळावरून लाकडी पलंगावर काही लांब केस आढळून आले आणि जवळच मोबाईल फोनचे मागील कव्हर सापडले. तेथून काही फाटलेली कागदपत्रेही जप्त करण्यात आली. मृतदेह सापडल्यानंतर पाच दिवसांनीही या वस्तू तेथेच कशा राहिल्या, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या अहवालामुळे घटनास्थळ आणि खुनाचे ठिकाण याबाबत नवे प्रश्न निर्माण झाले आहेत. आता या प्रकरणात सीबीआय काय आणि कधी निष्कर्ष काढणार आणि पीडितेला हा प्रलंबित न्याय अखेर कधी मिळणार असे प्रश्न उपस्थित होण्यास सुरवात झाली आहे.