पाकिस्तानने अफगाणिस्तानवर मोठा हवाई हल्ला केला आहे. पाकिस्तानने पक्तिका प्रांतातील बरमल जिल्ह्यात हा हवाई हल्ला केल्याचे सांगितले जात आहे. या हवाई हल्ल्यात महिला आणि लहान मुलांसह 15 जण ठार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. हा हल्ला 24 डिसेंबरच्या रात्री झाला असून ज्यामध्ये सात गावांना लक्ष्य करण्यात आले आहे . मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे. मात्र या हल्ल्यामुळे संतप्त झालेल्या अफगाणिस्तानने पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्याची धमकी दिली आहे. मार्चनंतर पाकिस्तानने दुसऱ्यांदा अफगाणिस्तानमध्ये हवाई हल्ला केला आहे.
अफगाणिस्तानने याला आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन म्हटले आहे.अफगाण संरक्षण मंत्रालयाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करत आपली नाराजी व्यक्त केली आहे. मंत्रालयाने लिहिले की अशी एकतर्फी पावले कोणत्याही समस्येवर उपाय नाहीत. मंत्रालयाने लिहिले की, ‘मातृभूमीचे रक्षण करणे हा आमचा अधिकार आहे, आम्ही या भ्याड हल्ल्याला नक्कीच प्रत्युत्तर देऊ.’
वृत्तपत्र डॉनने सुरक्षा अधिकाऱ्यांच्या हवाल्याने म्हटले आहे की, पाकिस्तानी लढाऊ विमानांनी मंगळवारी रात्री पूर्व अफगाणिस्तानमधील पक्तिका भागात तेहरीक-ए-तालिबानच्या चार स्थानांवर बॉम्बहल्ला केला आहे . ज्यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला असून बरेच जण जखमी झाले आहेत. मात्र, अफगाणिस्तानमधील हवाई हल्ल्याला पाकिस्तानकडून अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.
पाकिस्तानच्या लढाऊ विमानांनी 24 डिसेंबरच्या रात्री अफगाणिस्तानच्या पक्तिका प्रांतातील बरमल जिल्ह्यात पाकिस्तानने हवाई हल्ले केले आहेत. त्यामध्ये महिला आणि मुलांसह किमान 15 लोक मारले गेले. या हल्ल्यात लक्ष्य करण्यात आलेल्या गावांमध्ये लमानचाही समावेश होता, जिथे एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. बर्मालचे मुर्ग बाजार गाव पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असून या हल्ल्यात अनेक लोक जखमीही झाले आहेत. तालिबानच्या संरक्षण मंत्रालयाने या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला असून पाकिस्तानच्या या रानटी हवाई हल्ल्यांना प्रत्युत्तर दिले जाईल, असे म्हटले आहे. सर्व आंतरराष्ट्रीय कायद्यांकडे दुर्लक्ष करून हा हल्ला करण्यात आल्याचे मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले आहे. या हल्ल्यांमुळे प्रश्न सुटणार नाहीत, याचा विचार पाकिस्तानने केला पाहिजे.असे अफगाणिस्तानने म्हंटले आहे.
अलिकडच्या काही महिन्यांत पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील तणावपूर्ण संबंधांच्या दरम्यान पाकिस्तानने केलेला ताजा हल्ला, दोन्ही देशांमध्ये सुरू असलेला संघर्ष वाढवू शकतो. अफगाणिस्तानातील तालिबान या दहशतवाद्यांना आश्रय देत असल्याचा पाकिस्तानचा आरोप आहे, तर अफगाणमधल्या तालिबानने हा आरोप फेटाळून लावला आहे.