माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची आज १०० वी जयंती आहे. दिल्लीतील त्यांची समाधी असलेल्या सदैव अटल येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पीएम मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक नेत्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण करणारा लेख लिहिला आहे.
दिवंगत ज्येष्ठ नेत्याचे स्मरण करत पंतप्रधान मोदींनी लिहिले आहे की, २५ डिसेंबर हा भारतीय राजकारण आणि भारतीय जनतेसाठी सुशासनाचा दृढ दिवस आहे. आपल्या सौजन्याने, साधेपणाने आणि दयाळूपणाने कोट्यवधी भारतीयांच्या मनात स्थान निर्माण करणारे आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणून आज संपूर्ण देश भारतरत्न अटलजींचे स्मरण करत आहे. त्यांच्या राजकारणाबद्दल आणि त्यांच्या योगदानाबद्दल संपूर्ण देश कृतज्ञ आहे.
त्यांनी लिहिले आहे की, ‘आमचा देश अटलजींचा सदैव ऋणी राहील, ज्यांनी भारताला २१व्या शतकात प्रवेश करण्यासाठी मार्गदर्शन केले.1998 मध्ये त्यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली तेव्हा आपला देश राजकीय अस्थिरतेतून जात होता. 9 वर्षात आपण 4 लोकसभा निवडणुका पाहिल्या होत्या. भारतातील लोक निराश झाले होते आणि सरकार आपली जबाबदारी पार पाडू शकतील की नाही याबद्दल शंका होती पण अटलजींनीच हे संकट तारले आणि एक स्थिर आणि प्रभावी सरकार देशाला दिले. त्यांच्या साध्या आणि सरळ विचारसरणीमुळे त्यांना सामान्य नागरिकांच्या समस्या आणि प्रभावी प्रशासनाची दिशा समजली.
पंतप्रधान मोदींनी आपल्या लेखात लिहिले आहे की, ‘सामान्य कुटुंबातून आलेल्या अटलजींनी देशाला स्थिरता आणि सुशासनाचे मॉडेल दिले आणि भारताला नवीन विकासाची हमी दिली. त्यांच्या सरकारने देशाला आयटी आणि टेलिकम्युनिकेशनच्या जगात वेगाने पुढे नेले. तंत्रज्ञान सर्वसामान्यांच्या आवाक्यात आणण्याचे काम त्यांच्याच काळात सुरू झाले. वाजपेयी सरकारच्या काळात सुरू झालेली आणि महानगरांना एकत्र आणणारी सुवर्ण चतुर्भुज योजना आजही आपल्या आठवणींमध्ये आहे. लोकल कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी त्यांच्या आघाडी सरकारने पीएम ग्राम सडक योजनेसारखे कार्यक्रमही सुरू केले.
पीएम मोदींनी पुढे लिहिले आहे की दिल्ली मेट्रो वाजपेयींच्या काळात सुरू झाली होती, ज्याचा आज आमचे सरकार जागतिक दर्जाचा पायाभूत सुविधा प्रकल्प म्हणून विस्तार करत आहे. जेव्हा जेव्हा सर्व शिक्षा अभियानाची चर्चा होते तेव्हा अटलजींच्या सरकारचा उल्लेख नक्कीच होतो. भारतातील सर्व अनुसूचित जाती जमातींसाठी आणि महिलांसाठी शिक्षण सोपे आणि सुलभ असावे अशी त्यांची इच्छा होती. अटल सरकारच्या अशा अनेक धाडसी कृती आहेत, ज्या आजही अभिमानपूर्वक देशवासीयांच्या आठवणीत आहेत.
11 मे 1998 चा तो गौरवशाली दिवस आजही देशाला स्मरणात आहे, जेव्हा पोखरणमध्ये NDA सरकारच्या स्थापनेनंतर काही दिवसांनी यशस्वी अणुचाचणी पार पडली. या चाचणीनंतर जगभरात भारतीय शास्त्रज्ञांची चर्चा सुरू झाली. अनेक देशांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली, पण अटलजींच्या सरकारने कोणत्याही दबावाची पर्वा केली नाही.आंतरराष्ट्रीय निर्बंधांचा सामना करूनही वाजपेयी यांचे तत्कालीन एनडीए सरकार खंबीरपणे उभे राहिले आणि या घटनेने वाजपेयींच्या ठाम आणि प्रभावी नेतृत्व क्षमतेचे दर्शन भारतीय जनतेबरोबर जगालाही झाले.
अटलबिहारी वाजपेयी यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त, त्यांना आदर्श मानत भारतासाठीचे त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण स्वतःला समर्पित करूया. सुशासन, एकता आणि प्रगती या त्यांच्या तत्त्वांना मूर्त रूप देणारा भारत घडवण्याचा प्रयत्न करूया असे म्हणत पंतप्रधान मोदींनी देशाला संबोधित केले आहे.